'...तर तुम्हाला 'अग्निवीर' होता येणार नाही', लष्कराने दिला थेट इशारा

अग्निपथ योजनेला विरोध करताना काही ठिकाणी हिंसाचार उसळला आहे. अशा हिंसाचारात ज्या तरुणांची नावं FIR मध्ये असतील त्यांची अग्निवीर म्हणून निवड करण्यात येणार नसल्याचं लष्कराने स्पष्ट केलं आहे.
'...तर तुम्हाला 'अग्निवीर' होता येणार नाही', लष्कराने दिला थेट इशारा
(रांचीमध्ये अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करताना तरुण)

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने लष्करासाठी जी अग्निपथ योजना आणली आहे त्याबाबत देशभरात हिंसक निदर्शनं सुरु झाली आहेत. दरम्यान, रविवारी (19 जून) तिन्ही सेनादलांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये लष्कराच्या वतीने हिंसाचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला गेला असेल तर ते 'अग्निवीर' होऊ शकणार नाहीत.

लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, जेव्हा उमेदवार अर्ज करतील तेव्हा त्यांना हे नमूद करावे लागेल की ते अग्निपथ योजनेच्या विरोधादरम्यान हिंसाचार आणि तोडफोडीमध्ये सहभागी नव्हते.

लष्कराच्या वतीने सांगण्यात आले की, आंदोलकांपैकी काही जणांना हे माहित नाही की, ही हिंसक आंदोलनं म्हणजे एक कट होता. परंतु तरुणांना काही लोकांकडून भडकावले जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या योजनेवर काम सुरू असल्याचे लेफ्टनंट जनरल म्हणाले. त्यातील प्रत्येक तपशीलाकडे लक्ष दिले गेले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तरुणांच्या वेदना समजून घेतल्याने आम्ही योजनेत वयोमर्यादेत 2 वर्षांची वाढ केली आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, 'आम्हाला यंग आर्मी हवी आहे. ही योजना आता रद्द केली जाणार नाही. ते म्हणाले की, 4 वर्षांनंतर अग्निवीर काय करणार? असा सवाल उपस्थित करत या योजनेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यांना आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, देशातील 85 उद्योगांनी अग्निवीरांना आपल्या कंपन्यांमध्ये घेणार असल्याचे सांगितलं आहे, परंतु हे एका रात्रीत शक्य नाही.'

(रांचीमध्ये अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करताना तरुण)
मोदी सरकार मागे हटणार नाही.. अग्निपथ योजना रद्द करण्यास नकार; लष्कराने केलं जाहीर

'जर आम्ही उद्योगपतींना ही योजना अगोदरच सांगितली असती, तर त्यांनाही प्रश्न पडले असते की या अग्निवीरांची क्षमता काय असेल, प्रक्रियेचा आधार काय असेल, या सगळ्याला बराच वेळ लागला असता जे शक्य नव्हतं.'

दरम्यान, हवाई दलाचे कार्मिक प्रभारी एअर मार्शल सूरज झा यांनी सांगितले की, आता सर्व भरती ही अग्निवीरच्या माध्यमातूनच होणार आहे. यावेळी तरुणांची रास्त मागणी देखील लक्षात घेण्यात आली आहे आणि त्यामुळेच अग्नीविरांसाठी वयोमर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे जे पात्र आहेत त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. 2 वर्षांचा दीर्घ कालावधी आहे, अशा परिस्थितीत या सर्वांची पुन्हा तपासणी केली जाईल, त्यानंतरच त्यांची हवाई दलात निवड केली जाईल. असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in