#ArrestCharanjitChanni : पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची का होतेय मागणी?

चरणजित सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ : जूनं प्रकरण पुन्हा चर्चेत... ट्विटरवर ट्रेंड
#ArrestCharanjitChanni : पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची का होतेय मागणी?
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी. AajTak

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच चरणजित सिंग चन्नी यांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. महिला अधिकाऱ्यासंबंधातील जुन्या प्रकरणावरून चन्नी यांच्या अटकेची मागणी केली जात असून, ट्विटरवर #ArrestCharanjitChanni ट्रेंडिंगमध्ये आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विषयांचीही चर्चा सुरू झाली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते Me Too प्रकरणापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरून ते वादात सापडले होते. यापैकीच एक म्हणजे Me Too प्रकरण.

काय आहे Me Too प्रकरण?

साल होतं २०१८. याचं वर्षी एका महिला आयएएस अधिकाऱ्याला चरणजित सिंग चन्नी यांनी अश्लील मेसेज पाठवल्याचं प्रकरण घडलं. कॅबिनेट मंत्री असताना चन्नी यांनी महिला अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवल्याचं प्रकरण विरोधकांनी उचललं. चन्नी यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. मात्र, तत्कालिन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी चरणजित सिंग यांना माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला होता.

दरम्यान, यावर्षी मे महिन्यात अचानक हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी चरणजित सिंग चन्नी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. इतकंच नाही, तर त्यांनी उपोषण करण्याचाही इशारा दिला होता. मात्र, प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात गेलं.

हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. नेटकऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला पाठवलेल्या मेसेजवरून चरणजित सिंग चन्नी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबद्दलच्या विविध बातम्या आणि प्रतिक्रिया ट्वीट केल्या जात असून, त्यामुळे #ArrestCharanjitChanni हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

याबरोबर अनेक वादांमध्ये त्यांचं नाव आलं होतं. टॉस करून नियुक्ती करण्यावरूनही ते चर्चेत आले होते. ते तंत्र शिक्षण मंत्री असतानाच्या काळात पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटसाठी प्राध्यापकपदाची भरती करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडे प्रकरण आलं होतं. दोन प्राध्यापकांना एकाच ठिकाणी नियुक्ती हवी होती. यावेळी चरणजित सिंग यांनी टॉस करून त्यांची नियुक्ती केली होती.

Related Stories

No stories found.