
धनंजय साबळे, अमरावती
अमरावतीच्या उत्तमसरा येथील एकाच घरात तब्बल 22 नाग (Cobra)जातीचे सापा सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, अमरावतीमधील सर्प मित्रांना बोलावून तात्काळ या सर्व सापांना पकडून सुरक्षितपणे पोहरा जंगलात सोडण्यात आले आहे.
पावसाळ्यात घरात साप निघणे ही बाब सामान्य असू शकते. पण एकाच घरात 22 जहाल विषारी कोब्रा आढळल्याची घटना म्हणजे दुर्मिळच. अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा येथे एका घरात तब्बल 22 कोब्रा जातीच्या सापाचे पिल्लू आढळून आले. दिवसभर रेस्क्यू ऑपरेशननंतर हे सगळे साप पोहरा जंगलात सोडण्यात आले आहेत.
उत्तमसरा येथील मंगेश सायंके हे कुटुंबासह काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. गुरुवारी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ सापाची कात आढळली. पण त्याकडे त्यांनी फार काही लक्ष दिलं नाही आणि आपल्या दैनंदिन कामामध्ये मग्न झाले.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अंथरूण टाकत असताना त्यातून अचानक एक साप निघाला. त्यामुळे मंगेश यांच्यासह संपूर्ण कुटुंबाची पाचावर धारण बसली. यावेळी मंगेश यांनी तात्काळ वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांना तातडीने कळविले.
भूषण सायंके यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुरुवातीला छोटा नाग पकडला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी स्वयंपाकघरातील तुराटीच्या कुडावर नागाची आणखी दोन पिल्लं दिसून आली. त्यामुळे पुन्हा एकदा भूषण यांना बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांनी संपूर्ण कुडच काढून टाकला. तेव्हा जे चित्र दिसलं त्याने संपूर्म सायंके कुटुंबीयांची बोबडीच वळली. कारण त्या कुडामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 22 नागांची पिल्लं होती.
दिवसभराच्या शोधकार्यात कोब्रा नागाची एकूण 22 पिले आढळली. भूषण सायंके, पंकज मालवे यांनी सुरक्षितपणे या सर्व नागांना पकडलं. नंतर त्यांनी या सापांची वनविभागात नोंद केली व जवळच्या पोहरा येथील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेत मंगेश सायंके यांच्या कुटुंबीयांनी वेळीच सर्पमित्राला पाचारण केल्याने एक मोठा प्रसंग टळला. तसेच 22 नागांची देखील यावेळी सुटका झाली. सध्या या घटनेचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल देखील होत आहे. ज्यामुळे नागाची अनेक पिल्लं दिसून येत आहेत. ही सर्व नागाची पिल्लं आता दूर जंगलात सोडली आहेत. मात्र, या घटनेची सध्या अवघ्या अमरावतीत चर्चा सुरु आहे.