"हे असंच चाललं, तर ते गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील"

असदुद्दीन ओवैसींची राजनाथ सिंहांच्या विधानावर टीका : 'इतिहासाला विकृत करून मांडलं जातंय'
"हे असंच चाललं, तर ते गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील"
एमआयएमचेे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी.ANI

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून ब्रिटिशांकडे दया याचिका केली होती', असं विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. त्यांच्या विधानावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. राजनाथ सिंह यांनी केलेल्या या दाव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. इतिहास विकृत करून सांगितला जात असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित लिखीत 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी दिल्लीत पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या माफीनाम्याबद्दलचं विधान केलं.

या विधानावरून आता इतिहास अभ्यासकांसह राजकीय नेतेही भाजपवर टीका करत आहेत. राजनाथ सिंह यांच्या विधानावर बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, 'ते (भाजप) विकृतपणे इतिहास कथन करत आहेत. जर हे असंच सुरु राहिलं, तर ते महात्मा गांधी यांना हटवतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील; ज्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता आणि त्यांना न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत दोषी ठरवण्यात आलं होतं', अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले?

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, 'राष्ट्र नायकांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांचा अपमान करणं हे सहन केलं जाणार नाही. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान हे काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केलं.'

एमआयएमचेे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी.
Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर...: मोहन भागवत

'सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे अनेक दया याचिका दाखल केल्या, हे सातत्यानं सांगितलं जातं. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतर त्यांनी दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधींनीही त्यावेळी सावरकरांना सोडून द्यावं असं आवाहन ब्रिटिशांना केलं होतं.'

'तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेनं स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीनं सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती. क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केलेली.'

Related Stories

No stories found.