
ठाकरे सरकार ड्रग्ज माफियांच्या तालावर नाचतं आहे असं म्हणत अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला. त्यावरून बरीच टीका होते आहे. नवाब मलिक यांनी पैचान कौन असं म्हणत हा फोटो ट्विट केला होता. अशा सगळ्या परिस्थितीत भाजपने टीका केली आहे.
'एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे’, अशी खोचक टीका भातखळकर यांनी मलिकांच्या आरोपांवर केली आहे.
‘NCB चे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल FIR दाखल करावा’, अशी मागणीही भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीय.
समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधत मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलंय. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.