12 MLAs : राज्यपालांच्या नावाने काढलेल्या बोगस पत्रातील 'त्या' सहा व्यक्ती कोण आहेत?

राज्यपाल निर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न भिजत पडलेला असतानाच एका बनावट पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली...
12 MLAs : राज्यपालांच्या नावाने काढलेल्या बोगस पत्रातील 'त्या' सहा व्यक्ती कोण आहेत?

राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ आमदारांचा मुद्दा आज पुन्हा ऐरणीवर आला. याला कारण ठरलं राज्यपालांच्या नावाने समोर आलेलं एक बोगस पत्र. २०२० मधील हे पत्र असून, यात सहा व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. पत्र बनावट असलं, तरी त्या व्यक्ती कोण आहेत, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल निर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ जणांची नावे सुचवलेली आहेत. मात्र, प्रस्तावाची ही फाईल अजूनही प्रलंबित आहे.

राज्यपालांच्या कोट्यातील या आमदारांच्या नियुक्तीबद्दल वारंवार सरकारकडून स्मरणही करून दिलं गेलं, पण अद्यापही ही फाईल मंजुरीविना पडून आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही यासंदर्भात पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनीही हा मुद्दा मोदींकडे उपस्थित केला.

१२ आमदारांच्या नियुक्तीच्या वादाची धुळ खाली बसलेली असतानाच आज एक पत्र समोर आलं. हे पत्र बनावट असल्याचं नंतर राजभवनाने स्पष्ट केलं. या बनावट पत्रामध्ये सहा व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.

राजकीय, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील सहा व्यक्तींच्या नावांचा या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे. वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबुराव कोकाटे-आडसकर (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ (सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांची नावे या पत्रात आहे.

यातील वीरभद्रेश करबसप्पा बसवंती हे भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष होते. कसबा गणपतीचे सल्लागार होते. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकही त्यांनी लढवलेली होती. एप्रिल २०२१ मध्ये त्यांचं कोरोनामुळे निधन झालं.

रमेश बाबुराव कोकाटे-आडसकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सध्या ते भाजपमध्ये असून, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा माजलगाव मतदारसंघात पराभव झाला होता. आर.टी. देशमुख यांच्या ऐवजी रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली गेली होती.

या यादीत सतीश रामचंद्र घरत यांचं नावही असून, उद्योग क्षेत्रातून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. संतोष अशोक नाथ यांच्या नावाचा समावेश असून, ते संतोष नाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.

मोरेश्वर महादू भोंडवे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक आहेत. तर जगन्नाथ पाटील हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील तिटवे हे पाटील यांचे मूळ गाव. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पीएचडी मिळवली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातच उपकुलसचिव म्हणूनही काम केलं. ‘जेपी’ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

Related Stories

No stories found.