"ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल"

बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून मुंडे बहीण-भावामध्ये संघर्ष : काय आहे वादाचा मुद्दा?
"ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल"

-रोहिदास हातागळे, बीड

वाळू माफिया, वाढती गुन्हेगारी आणि इतर घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता राजकारणाचा पाराही चढला आहे. बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून मुंडे बहीण-भावांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपांना पंकजा मुंडे यांनी एका सभेत उत्तर दिलं.

"ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची मान खाली होईल. अशा पद्धतीने कधीही वागणार नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीड जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. "मी कधी कुणाकडून पैसे खाल्ले नाही. कधी कुणाचा चहा पिले नाही. कधी कुणावर खोट्या कारवाया केल्या नाहीत. बदनामी करण्यासारखं कोणतं काम मी केलं नाही. ज्या दिवशी माझ्याकडून बदनामी सारखं काम होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असेल", अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं.

"ग्रामविकास मंत्री असताना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकारी दवाखाने, रस्ते सर्व ठिकाणी भरघोस निधी दिला. आज त्याचे लोकार्पण करून उद्घाटन करत आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षात एक तरी विकास काम आणलं का?", असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

"आता परळीच्या जनतेला वीट आला आहे. चुकून झालेला विजय महागात पडणार. माझा परळीत फार्महाऊस नाही. परळीत माझा महाल नाही. आता जनतेला मी मी म्हणणारा नेता नकोय, आता जनता जनता म्हणणारा नेता हवा आहे. अहंकाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे आपलं सरकार येईल, सर्व जण मिळून आता कामाला लागा", असं पंकजा मुंडे यांनी सांगत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मूट बांधायला सुरुवात केली.

बीड जिल्ह्याच्या बदनामीचा वाद काय?

बीड जिल्ह्याच्या बदनामी वरून आता मुंडे बंधू-भगिनीमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. बीड जिल्ह्यातील वाळू माफिया,गुटखा माफिया, वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, अधिकाऱ्यांची होणारी मुस्कटदाबी यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. तसेच सत्ताधारी पक्षातील दोन आमदारांनी देखील अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती.

या मुद्द्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याची बदनामी करू नका असं म्हटलं होतं. "कृपा करून माझ्याकडून काही चुकत असेल, तर हात जोडून विनंती करतोय. वैयक्तिक माझ्यावरती टीका करा, मात्र जिल्ह्याची बदनामी करू नका. भाजपच्या काळातच जिल्ह्याची मोठी बदनामी झाली," असं धनंजय मुंडे म्हणाले होते. यावरूनच आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा समाचार घेतला. त्यामुळे जिल्ह्याच्या बदनामीवरून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा बदनामीचा मुद्दा गाजण्याची चिन्हं दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव कुणी केलं आणि बदनाम कुणी केल ? हा खरा प्रश्न आता जनतेला पडला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in