Anil Parab: परिवहन भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

Nashik Police Report submitted on transport corruption : मंत्री अनिल परबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परिवहन भ्रष्टाचार प्रकरणी नाशिक शहर हद्दीत असा गुन्हा न घडल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
Anil Parab: परिवहन भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा
अनिल परब यांना दिलासा

प्रविण ठाकरे, नाशिक

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरणी जे आरोप (allegations of transport corruption) करण्यात आले होते त्याबाबत नाशिक पोलिसांना (Nashik Police) चौकशीत तसे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेली चौकशी पूर्ण झाली असून शहर पोलिसांच्या हद्दीत असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचा अहवाल नाशिक शहर पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे दिला आहे.

या प्रकरणी निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये परिवहन विभागातील बदल्यांमध्ये 300 कोटीच्या भ्रष्टाचार तसेच आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब, संबंधित विभागाचे सचिव यांच्यासह विभागातील अन्य अधिकाऱ्यांवर करण्यात आले होते.

याप्रकरणी नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्याकडे तपास सोपवत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

अनिल परब यांना दिलासा
अनिल परबांसाठी वेगळे नियम का? नितेश राणेंकडून परबांच्या CBI चौकशीची मागणी

25 मेपासून याप्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त यांच्यातर्फे सुरु करण्यात आली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर पंधरा दिवसात चौकशी पूर्ण झाली.

परिवहन विभागाचे अप्पर सचिव, उपसचिव, धुळे, जळगाव, नाशिक ह्या जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , मोटार वाहन निरीक्षक, तसेच परिवहन कार्यालया संदर्भात काम करणारे खाजगी व्यक्ती अशा सुमारे 35 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली.

सुरुवातीस आरोप करणारे गजेंद्र पाटील हे सहकार्य करणार की नाही हा प्रश्न होता, मात्र वकिलांसह उपस्थित राहत पाटील यांनी आपली बाजू मांडली आणि प्रकरणाशी निगडित पुरावे दिले. ही चौकशी लांबत असल्याने काय निष्पन्न होणार हा प्रश्न होता? मात्र लवकरच चौकशी पूर्ण झाली आणि चौकशी अहवाल बनवण्यात आला.

अनिल परब यांना दिलासा
माझ्याविरोधातली तक्रार पूर्णपणे निराधार ! भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अनिल परबांचं स्पष्टीकरण

आता हा अहवाल पोलीस आयुक्तांनी तपासून पुढील कारवाईसाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पाठविला आहे.

नेमकं प्रकरण काय?

Motar Vehicale Inspector म्हणून काम करणारे गजेंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब, आयुक्त ढाकणे यांच्यावर लाच घेतल्याचा आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

परिवहन विभागात बदल्यांसाठी लाच घेणाऱ्या Deputy RTO चं नावही पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं. हा अधिकारीच या सर्व रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं पाटील यांनी म्हटलं होतं.

परिवहन विभागात बदली करण्यासाठी कोट्यवधी रुपये लाच म्हणून मागितले जातात. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्तपदावर नेमणूक करण्यासाठी तक्रार अर्जात नाव नमूद केलेल्या मुख्य सुत्रधाराने पाच कोटींची लाच परिवहन मंत्री अनिल परब यांना दिली होती.

याव्यतिरीक्त पाटील यांनी आपल्या तक्रार अर्जात दोन जिल्ह्यांमधील RTO अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. चेकपोस्ट हे RTO अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचं महत्वाचं कुरण बनल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं.

अनिल परब यांना दिलासा
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना

या सर्व प्रकाराविरोधात आपण आवाज उठवला, वरिष्ठांच्या दबावाला बळी न पडल्यामुळे चुकीच्या आरोपांखाली आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पाटील यांनी 'मुंबई तक'शी बोलताना सांगितलं होतं.

परिवहन विभागात प्रत्येक पोस्ट आणि त्याच्या बदलीसाठी किती पैसे लाच म्हणून घेतले जातात याची माहिती पाटील यांनी पोलिसांना दिली होती. 15 मे रोजी पाटील यांनी इ-मेल द्वारे नाशिकमधल्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आपल्या तक्रारीत नाव आलेल्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पाटील यांनी केली होती.

पाटील यांची तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. ज्यात तिन्ही अधिकारी DCP दर्जाचे होते. DCP Crime संजय बारकुंड हे या समितीचे प्रमुख आहेत.

या आरोपांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in