
राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं एक हिरव्या रंगातील आणि ऊर्दू भाषेत मजकूर असलेलं होर्डिग राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. या होर्डिंगवरून भाजप व आपने शिवसेनेला टोला लगावला आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मात्र, या नव्या राजकीय समीकरणानंतर भाजपकडून सातत्याने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचण्याचा प्रयत्न केले गेले.
हिंदुत्वावरून दोन्ही पक्षात सातत्यानं कलगीतुरा रंगताना दिसला. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका होर्डिंगमुळे शिवसेना भाजपतील हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानेही या होर्डिंगवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांचं होर्डिग ट्विटरवर शेअर करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. या फोटोला 'ज्वलंत हिंदुत्व' अशा ओळी देत आमदार भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला.
दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनीही आदित्य ठाकरेंचं हे होर्डिंग ट्वीट केलं आहे. त्याचबरोबर 'भगवा झाला हिरवा... छानच' असंही म्हटलं आहे. एकप्रकारे आपनेही शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चिमटा काढला आहे.
मुंबई महापालिका...
शिवसेना, भाजपबरोबरच आम आदमी पक्षही मुंबई महापालिकेच्या तयारीला लागला आहे. काही महिन्यांपूर्वीच आपच्या मुंबईतील कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. या तीन पक्षांबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी यांचीही महापालिकेसाठी तयारी सुरू झाली आहे.