'महाराष्ट्राच्या राबडीदेवी' असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?

'महाराष्ट्राच्या राबडीदेवी' असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?

शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे मित्र. आता मात्र त्यांच्यातून विस्तवही जात नाही. अशात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना उद्देशून एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी रश्मी ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राबडीदेवी असा केला होता. ही टीका शिवसेनेला चांगलीच झोंबते आहे. शिवसेनेने थेट पोलिसात तक्रार केली. मात्र भाजपने आम्ही तर राजकीय परिस्थितीच समोर आणली असं म्हटलं.

या सगळ्या चर्चेला तोंड फोडलं होतं ते भाजप आमदार नितेश राणे यांनी. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सोनी लिव्ह वरील महारानी या वेबसीरिजचं पोस्टर ट्विट केलं आणि महाराष्ट्रावर अशी वेळ येऊ नये असं म्हटलं होतं. या वेब सीरिजमध्ये बिहारचे मुख्यमंत्री आजारी होतात आणि मग त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागतं. ही वेबसीरिज राबडीदेवींवर बेतलेली होती अशीही चर्चा झाली होती. मात्र नितेश राणेंनी हे पोस्टर ट्विट करून अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये म्हटलं होतं.

'महाराष्ट्राच्या राबडीदेवी' असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट,पोलिसांनी बजावली नोटीस

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीही चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य होतं की उद्धव ठाकरे खूपच आजारी असतील तर त्यांनी रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या असं म्हटलं होतं. ही दोन्ही उदाहरण लक्षात घेतली तरीही प्रश्न उपस्थित राहतो की महाराष्ट्राची राबडीदेवी असं रश्मी ठाकरेंना म्हटलं गेल्यावर शिवसेनेचा एवढा तिळपापड का होतो आहे? ही तुलना योग्य आहे का? हा मुद्दा चर्चेचा आहे.

राबडीदेवी आणि रश्मी ठाकरे या दोघींची तुलना होऊ शकते का? हे जाणून घेण्याआधी आपण समजून घेऊ की राबडीदेवी बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या कशा? 1997 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळा केल्याचा आरोप झाला. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही निघालं. सीबीआयने ही चौकशी हाती घेतली होती. अटक टाळण्याचा लालूप्रसाद यादव यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यांना कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. सीबीआयने त्यांच्याविरोधात वॉरंट काढलं ज्यामुळे लालूप्रसाद यादव यांची अटक अटळ झाली होती.

लालूप्रसाद यादव यांनी त्यावेळी नुकताच जनता दलाशी फारकत घेऊन राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दल हा पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी दिल्लीमध्ये युनाटेड फ्रंटचं सरकार अस्तित्त्वात होतं. तरीही लालूप्रसाद यादव यांची अटक होणार ही गोष्ट अधोरेखित झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागणार हे देखील सूर्यप्रकाशाइतकं लख्ख झालं होतं. मुख्यमंत्री म्हणून सीबीआयने त्यांना अटक करणं यातून एक घटनात्मक पेच उभा राहिला असता. या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या पक्षात अनेक जुने-जाणते आणि त्यांच्यासोबत काम केलेले नेते होते.

शिवानंद तिवारी, जनार्दन तिवारी असे अनेक नेते राजदमध्ये होते. लालूप्रसाद यादव यांनी या सगळ्यांशी चर्चा केली आणि अचानक संपूर्ण देशाला धक्का बसेल असा निर्णय सुनावला. तो निर्णय होता राबडीदेवींना म्हणजेच त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करण्याचा. त्यांच्या पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांनीही तो निर्णय मान्य केला. राबडीदेवींशी चर्चा न करता त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राबडीदेवी यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. त्या चूल आणि मूल सांभाळणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांनी लालूप्रसाद यांच्या राजकारणात कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यांचं शिक्षणही फार झालं नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थितीत एक राजकीय धक्का सगळ्यांनाच बसला. मुद्दा इतकाच मर्यादित राहिला नाही. तर पुढची दहा वर्षे राबडीदेवींनी बिहारचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.

लालूप्रसाद यादव हे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही निवडू शकले असते. मात्र त्यांनी त्यांच्या पत्नीची निवड केली. एका कुटुंबाच्या बळावर जे पक्ष चालत असतात त्यात इतर साथीदारांवर जास्त विश्वास ठेवला जात नाही. बिहारमध्ये 1997 ला तेच दिसून आलं होतं. तेजस्वी यादव हे तेव्हा खूप लहान होते. कितीही अशक्य वाटणारा होता तरीही तो निर्णय लालूप्रसाद यादव यांनी घेतला. या निर्णयाची इतर पक्षांनी यथेच्छ मस्करी केली. लालूप्रसाद यांना टार्गेटही करण्यात आलं. यात शिवसेनाही मागे नव्हती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनीही सामनाच्या अग्रलेखात लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांची टिंगल उडवली होती.

फाईल फोटो
फाईल फोटो

आता रश्मी ठाकरे यांची आणि राबडीदेवी यांची जी तुलना केली जाते आहे. रश्मी ठाकरे या उच्चशिक्षित आहेत. त्या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरीही पडद्यामागचे त्यांचे अनेक निर्णय महत्त्वाचे असतात असं शिवसेनेमध्ये मानलं जातं. या परिस्थितीत राबडीदेवी आणि रश्मी ठाकरे यांची तुलना होणं हे शिवसेनेला झोंबणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या बाजूला रश्मी ठाकरे यांची चर्चा का होते आहे याचा विचार केला तर ज्यावेळी एक कुटुंब एक पक्ष सांभाळत असतो त्यावेळी अशी चर्चा घडते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच सामना या दैनिकाचं संपादक पद सोडलं आणि ते रश्मी ठाकरेंकडे सोपवलं. रश्मी ठाकरेंनी पत्रकारिता कधीही केलेली नाही तरीही सामनासारख्या दैनिकाच्या त्या संपादक आहेत.

'महाराष्ट्राच्या राबडीदेवी' असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?
'भविष्यात रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहात जाहीर करा'-नितेश राणे

आता सध्या उद्धव ठाकरे यांची तब्बेत काहीशी नरम आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रकिया पार पडली. पक्षातल्या अनेकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत. सरकारचं कामही ते व्यवस्थित करत आहेत. इतिहासातही अनेक उदाहरणं आहेत की जेव्हा देशाचे, राज्याचे प्रमुख आजारी झाल्यानंतरही आपला कार्यभार दुसऱ्या कुणाकडे सोपवत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा कारभार मुंबईतून चालत होता. आत्ता उद्धव ठाकरेही कारभार चालवत आहेत.

भाजपने मात्र हा मुद्दा उपस्थित केला की जर उद्धव ठाकरे हे हिंडू फिरू शकत नसतील तर मुख्यमंत्रीपदाची सूत्रं कुणाला तरी द्यावी लागतील. त्यावरून भाजपने असा सूर लावला आहे की लालूप्रसाद यादव यांनी ज्या प्रमाणे राबडी देवींना दिली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला निवडतील. आदित्य ठाकरे हे आधीच मंत्री आहेत. वयाने आणि राजकीय अनुभवाच्या दृष्टीने ते लहान आहेत. त्यामुळे त्यांचं नेतृत्व इतर दोन पक्ष मान्य करतील का? हा प्रश्न राहतो. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या स्वतःच्या पक्षाचं सरकार होतं. इथे तशी स्थिती नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. निर्णय घ्यायचा असेल तर इतर दोन पक्षांची मान्यता असावी लागेल. अशा स्थितीत जेव्हा रश्मी ठाकरे आणि राबडीदेवी यांची तुलना केली जाते आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा संताप होणं न टाळता येण्यासारखं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in