Bypoll: कसबा, चिंचवडसाठी अखेर भाजपने जाहीर केले उमेदवार, ‘यांना’ दिलं तिकिट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोन्ही आमदारांचं निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता त्याच ठिकाणी भाजपने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत.

या दोनही मतदारसंघातून भाजपचे कोण उमेदवार असतील याची उत्सुकता होती. यावेळी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या घरातच उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपच्या उमेदवार असणार आहेत. खरं गेल्या काही दिवसांपासून चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांचे भाऊ निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिली आहे.

तर मुक्ता टिळक यांच्या घरातील मात्र कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी कालच मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर कुणाल टिळक यांची भाजपने महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती देखील केली होती. त्यानंतर आता कसब्यातून हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या अश्विनी जगताप कोण आहेत?

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या अश्विनी जगताप या मूळच्या साताऱ्याच्या आहेत. त्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षाही आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी जगताप यांना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं आहे.

ADVERTISEMENT

भाजपने उमेदवारी जाहीर केलेले हेमंत रासने कोण आहेत?

पुणे पालिकेतील कसब्यातून भाजपचे नगरसेवक आहे. पुणे पालिकेत ते भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. हेमंत रासने हे सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त देखील आहेत. त्यामुळे त्यांचा कसब्यात दांडगा जनसंपर्कही आहे.

ADVERTISEMENT

भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

‘मी वारंवार मांडत होतो त्याप्रमाणे शेवटी केंद्रीय नेतृत्वाने चिंचवड लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी घोषित केली आहे आणि कसब्यातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि दगडूशेट गणपतीचे विश्वस्त हेमंत रासने यांची उमेदवारी घोषित केली आहे.’

‘मी सुरुवातीला केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानेल की, त्यांनी या दोनही जणांना विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानेल. त्यांनी या दोघांनाही विधानसभेत जाण्यासाठी उमेदवारी दिली आहे.’

‘कालच मी आणि देवेंद्रजी स्वत: टिळक वाड्यात जाऊन शैलेंद्र आणि कुणाल टिळक यांना भेटून या विषयात चर्चा केली. त्या दोघांना भाजप योग्य ते स्थान देईल, बरोबरीचं, सन्मानाचं स्थान देईल. असं आश्वस्त केलेलं आहे आणि त्या दोघांनीही पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.’

‘जगतापांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. मोठ्या प्रमाणावर लोकांनी अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान पण त्याने समजदारी दाखवली आणि म्हटलं की, आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. आमच्या कुटुंबात ज्याला उमेदवारी त्याच्या मागे आम्ही सगळे जगताप उभे राहणार आहोत. त्यामुळे जगताप कुटुंबात कोणताही वाद नव्हता. मी नेहमी मांडणी केली तर वहिनी उमेदवार आणि शंकरभाऊ निवडणुकीचे प्रमुख असतील. आणि जर शंकरभाऊंना उमेदवारी मिळाली तर वहिनी निवडणुकीच्या प्रमुख असतील. आज मी या निवडणुकीचा प्रमुख म्हणून शंकर जगताप यांना घोषित करतो. तर कसब्यात माधुर मिसाळ या निवडणूक प्रमुख असतील.’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली आहे.

महाविकास आघाडीकडून ‘यांना’ उमेदवारी मिळण्याची शक्यता

महाविकास आघाडीकडूनही कसबा मतदारसंघातून काँग्रेस रविंद्र धंगेकर आणि चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी खात्रीलायक माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. मात्र, असं असलं तरीही महाविकास आघाडीने अद्याप तरी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

कोण आहेत राहुल कलाटे

राहुल कलाटे हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे महापालिकेतील दोन टर्म नगरसेवक आहेत. तसेच महापालिकेत ते शिवसेनेचे गटनेते देखील होते. याशिवाय ते शिवसेनेचे शहराध्यक्ष देखील होते.2014 आणि 2019 साली त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. शिवसेना-भाजप युती असताना लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात त्यांनी बंडखोरी केली होती.

कोण आहेत रवींद्र धंगेकर?

शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षातून 4 वेळा नगरसेवक. त्यांनी 2009 आणि 2014 साली मनसेकडून कसबा विधानसभा निवडणूक लढवली होती. 2017 साली त्यांनी पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT