
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते हे सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. मात्र, आता सत्ताधाऱ्यांच्या या टिकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी सरकारवर बरीच टीका केली आहे.
'थयथयाट तेच लोकं करु शकतात ते प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत.' असं म्हणत आशिष शेलारांनी राज्यातील सत्ताधारी नेजवर टीकेची झोड उठवली आहे.
पाहा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले:
'जेव्हा केव्हा तपास यंत्रणा आपलं काम करतात त्यावेळेस तपास यंत्रणाच्या कारवाईमुळे ज्या कोणावर कारवाई होते जे आरोपी असतात जे संशयित असतात अशा आरोप किंवा संशयित असलेल्या लोकांची किंवा त्यांच्या वतीने उत्तरं देता येत नाहीत त्यावेळेस काही राजकीय पक्ष विशेषत: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांच्या कारवाईवर उत्तर देऊ शकत नाही त्यावेळेला त्याच्या आड लपून भाजपवर हल्ला करतात.'
'खरं म्हणजे तपास यंत्रणेच्या कारवाईला उत्तर देता येत नाहीत मग भाजपवर हल्ला करायचा अशा प्रकारच्या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. थयथयाट तेच लोकं करु शकतात ते प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत.'
'गेल्या काही दिवसांपासून जे चाललं आहे ते आपल्यासमोर आहे. एनआयए असेल, ईडी असेल यांच्या ज्या कारवाया चालल्या आहेत त्यावेळी राज्याचे पोलीस काय डोळे बंद करुन होते का? सत्तेवर बसलेल्यांना सत्य माहिती नव्हतं का?'
'दाऊद हा कुख्यात दहशतवादी त्याचा पैसा, त्याच्या मालमत्ता, त्याच्या निकटवर्तींयांच्या मालमत्ता हा कशाकशामध्ये वापरला जातोय. याप्रकारच्या संशयाच्या बातम्या आल्या आहेत त्यावरच तपास यंत्रणांकडून काम चालू आहे. या चौकशा करायच्या नाहीत? तपास यंत्रणांना काही स्वातंत्र्य नाही? दाऊदचे हस्तक कोण आहेत त्याच्यापर्यंत जायचं नाही?'
'जर जनसामान्यांच्या प्रॉपर्टी बळकावल्या गेल्या असतील तर त्यावर तपास यंत्रणांनी काय डोळे बंद करायचे? त्यामुळे यंत्रणांवर दबाव, बदनामी हे जे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे चालू आहेत.'
'केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि सरकार वाचविण्यासाठी दाऊदच्या हस्तकांबाबत ज्या चौकशी सुरु आहेत त्यावर दबाव टाकणार? राज्यात कायदा सुव्यवस्था राज्यात आहे की नाही? जे सत्य आहे ते समोर येईलच. पण त्याआधीच पोपटपंची सुरु. पण माझी सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे की, ज्या देशहिताच्या गोष्टी आहेत त्यावर राजकारण नको. त्यामुळे तपास यंत्रणेला आपलं काम करु द्यावं.'
'सुप्रिया सुळे यांना थेट विनंती आहे. तुमचा आम्ही सन्मान करतो. तुम्ही महाराष्ट्रातील नेत्या आहात. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे याचा अर्थ भाजपच्या अध्यक्षांवर टीका-टिप्पणी कराल हे सहन केलं जाणार नाही. आत्मसन्मान आमच्या पक्षालाही आहे.'
'सरकारी यंत्रणाचा उपयोग पायमल्ली करण्यासाठी होतो असं गृहमंत्री म्हणाले. पण त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर एकदा नव्हे तर दोन केस टाकण्यात आल्या. तेव्हा आपल्याला सुचलं नाही का पायमल्ली ते..?' असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवरच टीका केली आहे.