
योगेश पांडे, नागपूर: राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र यापैकी काही अधिकाऱ्यांचा बदल्या या अवघ्या 12 तासातच रोखण्यात आल्याचं समजतं आहे. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. यावेळी त्यांनी या सगळ्यात काही घोटाळा तर झालेला नाही ना? असा सवालही उपस्थित केला आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
'काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, आदेश जारी होण्याच्या अवघ्या 12 तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आलेला आहे. आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? प्रशासकीय चूक आहे की आणखी काही याचा खुलासा झाला पाहिजे.' अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
'याआधी सुद्धा दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. नंतर त्याला बदली घोटाळ्याची किनार असल्याचं समोर आलं होतं. वसूलीचा तो भाग होता हे लक्षात आले होते. तोच हा प्रकार आहे का? हे समजलं पाहिजे.' असं ते म्हणाले.
दरम्यान, याचवेळी त्यांना पत्रकारांनी संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याविषयी देखील सवाल केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'संजय राऊत यांचा दोन महिन्यातील तिसरा नागपूर दौरा आहे. नागपुरच्या मातीत आणि वातावरणात वेगळेपण आहे. ते नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल.' असं म्हणत त्यांनी राऊतांवर अधिक भाष्य करणं टाळलं.
दुसरीकडे भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या पोलखोल रथयात्रेवर सध्या हल्ले चढविण्यात येत आहेत. याबाबत देखील देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर यावेळी निशाणा साधला.
'..तर आम्ही पोलिसांची देखील पोलखोल करू'
'पोलखोल आम्ही रोज करतो आहे. ज्यांची पोलखोल होते आहे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. त्यातून ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आमचा पोलखोल कार्यक्रम सुरूच राहणार आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले तर आम्ही पोलिसांची देखील पोलखोल करू.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत
'इंग्रजांचं राज्य जसं चालायचं तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे'
'अमरावती जिल्ह्यात इंग्रजांचं राज्य जसं चालायचं तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. सरकारचे मंत्री लांगुलचालन करत आहे. त्यातून परिस्थिती अधिक वाईट होते आहे. लांगुलचालनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहत आहेत. याला पोलीस आणि सरकारची भूमिका जबाबदार आहे. हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम अमरावती आणि जिल्हात होत आहे. त्यामुळे तणाव वाढतो आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका केली.