
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात राज्यभरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. भाजपचं राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांच्या घरांवरील हल्ला दुर्दैवी असल्याचं सांगत मागील काही काळात झालेल्या घटनांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना उलट सवाल केला आहे. उपाध्ये यांनी अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांपासून ते राज्यपालांना विमानातून उतरवण्यापर्यंत विविध घटनांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
उपाध्ये काय म्हणाले?
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून प्रतिक्रिया उमटत असताना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणतात, "ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खर आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण....," असं म्हणत उपाध्ये यांनी राज्यात घडलेल्या काही घटनांचा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे.
उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुद्दे...
"नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही पण याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते?"
"एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे."
"पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे."
"दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे."
"मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे."
"काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे."
"राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे."
"उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे."
"सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे."
"बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे."
"जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे."
"आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं, ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही," असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी अचानक शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक दिली होती. संतप्त आंदोलकांनी दगडफेक आणि चपला भिरकावल्याचा प्रकारही घडला. या घटनेवरून आता राज्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवरही या घटनेमुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.