'जनतेच्या मनातला हा शब्द खेचू शकत नाही', फडणवीस यांच्या 'त्या' वक्तव्याला पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

जाणून घ्या पंकजा मुंडे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे
'जनतेच्या मनातला हा शब्द खेचू शकत नाही',  फडणवीस यांच्या 'त्या' वक्तव्याला पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

मी मुख्यमंत्री नाही हे मला गेल्या दोन वर्षात जाणवलंच नाही. जनतेने मला तसं जाणवूच दिलं नाही असं आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत म्हटलं आहे. याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबात आनंद आहे कुणालाही असं वाटत असेल तर अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री त्यावर पंकजाताई लगेच म्हणाल्या की जनतेच्या मनातला हा शब्द तुम्ही खेचू शकत नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं.

आज नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे'

देवेंद्र फडणवीस यांनी आज हे वक्तव्य केल्याने अनेकांना त्यांच्या मी पुन्हा येईन या घोषणेचीही आठवण झाली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार करत असताना त्यांनी हे घोषवाक्य वापरलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. तसंच यावरून त्यांची खिल्लीही उडवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करून सगळ्यांना धक्काही दिला. मात्र ते सरकार अवघं 72 तास चाललं. त्यानंतर मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं. हे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण करणार आहे. दरम्यान आज नवी मुंबईतल्या वाशी या ठिकाणी बोलत असताना मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणताच तिथे असलेल्या सगळ्यांमध्येच हशा पिकला.

Related Stories

No stories found.