
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई गेल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस राऊत हे अधिवेशनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत होते आणि त्याचवेळी ईडीने त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली. या सगळ्या प्रकारानंतर आज (7 एप्रिल) संजय राऊत हे मुंबईत परतले. त्यावेळी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.
असंख्य कार्यकर्त्यांसह संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊतही मुंबई विमानतळावर हजर होते. मुंबई विमानतळावर येताच संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं आणि मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडी कारवाई आणि INS विक्रांत घोटाळा या दोन मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधला.
'केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप या महाराष्ट्रातून आमच्यावर हल्ले करतोय. आम्हाला तुरुंगात पाठवाल, तर माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ले केले तरी आमची तयारी आहे. पण लक्षात घ्या.. यापुढे पुढची 25 वर्ष तरी तुमची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही. याची व्यवस्था तुम्हीच करुन ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खणलेली आहे. ही कबर देशात सुद्धा खणली जाईल.' अशी घणाघाती टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले:
सगळ्यात पहिली गोष्ट.. हे समर्थन किंवा शक्ती प्रदर्शन नाही. ही शिवसेना आहे. ही लोकांच्या मनातील चीड आणि संताप आहे. माझ्यासोबत विनायक राऊत आहेत कालपासून. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत आहोत. आज INS विक्रांतचा जो घोटाळा झालेला आहे आपल्या महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून. आपण पाहिलं असेल की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज महाराष्ट्राच्या गाव पातळीवर शिवसैनिकांचं आंदोलन झालं आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. हा सुद्धा संताप आणि चीड आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ले केले जात आहेत ही नामर्दांगी आहे. त्याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. मला वाटतं ही सुरुवात आहे. ही ठिणगी पडलेली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावलं पडतील त्यानुसार आमची पावलं पडतील.
मी शरद पवार साहेबांचे आभार मानले आहेत जाहीरपणे. माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाविषयी त्यांनी पंतप्रधानांकडे जाऊन चर्चा केली. मी फक्त निमित्त आहे. महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्य राजकीय कार्यकर्त्यांवर, मंत्र्यांवर, आमदारांवर आणि खासदारांवर जे भाजपचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्यावर त्या प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. पवार साहेबांनी माझ्या निमित्ताने पंतप्रधानांकडे आपली खंत व्यक्त केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप या महाराष्ट्रातून जो आमच्यावर हल्ले करतोय ते फार तर काय करु शकतात.. मी आधीही सांगितलं आहे.. आम्हाला तुरुंगात पाठवाल तर माझी तयारी आहे. आमच्यावर खुनी हल्ले केले तरी आमची तयारी आहे. पण लक्षात घ्या.. यापुढे पुढची 25 वर्ष तरी तुमची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही. याची व्यवस्था तुम्हीच करुन ठेवली आहे.
तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खणलेली आहे. ही कबर देशात सुद्धा खणली जाईल. अशा प्रकारचं वर्तन आपण ठेवलं तर. राजकीय विरोधक हा विचाराने सामना करण्याचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सगळ्यांना उध्वस्त करु पाहत असाल तर त्यात तुम्ही सुद्धा उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही कालपासून INS विक्रांत या कोट्यवधीच्या घोटाळ्यावर बोलत आहोत. भाजपचे प्रमुख लोकं ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती.. जे प्रखर हिंदुत्ववादी लोकं आहेत ते किरीट सोमय्याला जाब विचारतील.. पण हा घोटाळा करणाऱ्या सोमय्याच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे.
सोमय्यांकडे उत्तर असूच शकत नाही कारण मी पुराव्यास भ्रष्टाचार उघड केला आहे. आम्हाला अपेक्षा होती की, आज राज्यसभेत या विषयावर कामकाज बंद पडलेलं आहे. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे लोकं याविषयावर बोलू शकत नव्हते. कारण त्यांनाही ते पटलं आहे की, हा भ्रष्टाचार झालेला आहे.
देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर या लोकांनी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा केले आणि ते पैसे निवडणुकीत वापरले आणि ते पैसे PMC बँकेच्या माध्यमातून व्हाईट मनी म्हणून या पैशाचं सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केलं आहे.
आम्ही सगळे एकत्र आहोत. काल पवार साहेब माझ्यासाठी पंतप्रधानांना भेटले याचा अर्थ तुम्ही स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे तीनही पक्ष संकटकाळी एकत्र आहेत. एकमेकांचे हात पकडून हे राज्य चाललं आहे. कोणत्याही संकटाला आम्ही सामोरं जाऊ. ज्याला तुम्ही संकट म्हणताय ती आमच्यासाठी संधी आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे आम्ही पंतप्रधानांना सांगितलं आहे. पवारांसारखा नेता जेव्हा पंतप्रधानांना भेटतो तेव्हा संपूर्ण देशामध्ये त्याची चर्चा होते आणि पंतप्रधानांनी शांतपणे महाराष्ट्रातील केंद्रीय तपास यंत्रणांचा हैदोस समजून घेतलेला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे विक्रांत युद्धनौकेबाबत घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा कारवाई करावी लागते. माझी अशीही माहिती आहे की, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी या विक्रांत घोटाळ्यासंदर्भात ज्यांनी-ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांनी विविध ठिकाणी सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.