'9 हजार फोन 500 इमेल खाती यांच्यावर UPA ने पाळत ठेवली, हे पाळतखोर आता आकांडतांडव करत आहेत'

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची घणाघाती टीका
'9 हजार फोन 500 इमेल खाती यांच्यावर UPA ने पाळत ठेवली, हे पाळतखोर आता आकांडतांडव करत आहेत'

संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हेरगिरीच्या प्रकरणांवर जोरदार गोंधळ घातला. एक दोन नाही तर तब्बल 300 भारतीयांची हेरगिरी केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘द वायर’ (The Wire) ह्या न्यूज पोर्टलनं यासंदर्भात एक बातमी दिली आहे. विरोधकांच्या या आरोपाला भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

काय म्हटलं आहे केशव उपाध्ये यांनी?

‘9 हजार फोन आणि ५०० इमेल खाती यांवर काँग्रेसचे नेत्तृत्व असलेल्या #UPA मध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात नजर ठेवण्यातआली ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करीत आहेत’, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून ट्विट केलं आहे. We know what he’s been reading- everything on your phone! #Pegasus असं म्हणत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. पेगासस स्पायवेअरच्या मदतीने मोदी सरकारमधले मंत्री, खासदार, आरएसएसचे नेते या सगळ्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने काय म्हटलं आहे?

केंद्र सरकारने हे सगळे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये येणारे या बातम्या चुकीच्या आहेत. कोणत्याही प्रकारचं टॅपिंग किंवा काही करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत हा एक बळकट लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशातील सगळ्या नागरिकांचे मौलिक अधिकार आणि खासगीकरणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

काय आहे Pegasus Spyware?

पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने विकसित केलं आहे. ही कंपनी सायबर वेपन कंपनी म्हणून जगप्रसिद्ध आहे. ही कंपनी चर्चेत आली ती 2016 मध्ये. त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला होता. त्यावेळी त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन वापरकर्त्यांचे फोन हॅक केले जात आहे. यानंतर अनेक दिवस गेले, ज्यानंतर Apple कंपनीने iOS चं अपडेटेड व्हर्जन आणलं. त्यावेळी त्यांनी हा दावा केला की आम्ही यातल्या त्या सगळ्या कमतरता दूर केल्या आहेत ज्या पेगाससद्वारे हॅक केल्या जाऊ शकतात.

या सगळ्या प्रकाराला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही बाब लक्षात आली की पेगासस स्पायवेअर हे अँड्रॉईड फोनही सहज हॅक करू शकतं. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्यानंतर 2019 मध्ये फेसबुकने (Facebook) NSO ग्रुपच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in