
मुंबई: कोल्हपूरच्या पोटनिवडणुकाचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन सभा घेत येथील मतदारांना काँग्रेस उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं आहे. पण यावेळच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तुफान टीका केली. 'देशामध्ये भाजपने देखील बनावट हिंदूहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला..' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना थेट आदेशच दिला आहे की, त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं. याचवेळी त्यांनी भाजपने बनावट, नकली हिंदूहृदयसम्राट बनविण्याचा प्रयत्न केला. अशी बोचरी टीका केली आहे.
पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'काल फडणवीस कोल्हापुरात येऊन गेले. त्यांनी काय सांगितलं.. 'मी पूर्वी यायचो.. तेव्हा ताराराणी चौकात पाठीमागच्या बाजूला होर्डिंग असायची. ज्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भगवी वस्त्र धारण केलेला रुद्राक्षाची माळा असायची आणि त्यावर काय लिहलेलं असायचं की, माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनी आणि मातांनो..'
'आता मी माझ्या भाषणाची सुरुवात काय केली.. हीच तर केली ना.. पहिली गोष्ट लक्षात घ्या देशामध्ये भाजपने देखील बनावट हिंदूहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला.. लोकांनी तो झिडकारला. एक बनावट, नकली हिंदूहृदयसम्राट बनविण्याचा प्रयत्न तुम्ही केला. पण लोकांनी झिडकारलं.'
'तुम्हाला जर हिंदूहृदयसम्राटांबद्दल एवढं प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. ज्या हिंदूहृदयसम्राटांबाबत तुम्ही एवढं बोलतात. त्यांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो.. आजसुद्धा ती खोली तशीच आहे. त्या खोलीत अमित शाहांनी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं? याचं उत्तर तुम्ही का नाही देत?' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपला विचारला आहे.
12 एप्रिलला मतदान
दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 12 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
चंद्रकांत जाधव यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती, ज्यातून ते बरे झाले होते. परंतू यानंतर त्यांची पुन्हा तब्येत बिघडली होती. यानंतर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.
काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाधव यांच्या पत्नीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. परंतू ती नाकारुन जाधव यांच्या पत्नीने काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आता या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार लढत सुरु आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत इथे नेमकं कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.