'सख्त राहों में भी आसान सफर लगता है!' Sonu Sood ने त्या आरोपांवर सोडलं मौन!

जाणून घ्या सोनू सुदने नेमकं काय म्हटलं आहे?
'सख्त राहों में भी आसान सफर लगता है!'  Sonu Sood ने त्या आरोपांवर सोडलं मौन!
Sonu Sood breaks silence on I-T raid controversy

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरं, कार्यालयांसह विविध मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाने मोठा खुलासा केला आहे. सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा दावा आयकर विभागाकडून करण्यात आला आहे. 15 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने सोनू सूदच्या मुंबईत सहा मालमत्तांची पाहणी केली होती. त्यानंतरही तीन दिवस तपासणी सुरूच होती.

तीन दिवस चाललेल्या तपासणीनंतर आयकर विभागाकडून सोनू सूदवर कर चोरीचा आरोप करण्यात आला सोनू सूदने 20 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा दावा आयकरने केला आहे. आता याबाबत सोनू सुदने आपलं मौन सोडलं आहे. सोनू सूदने ट्विटरवर “सख्त राहों में भी आसान सफर लगता है,हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है” असं कॅप्शन देत एक आपलं स्टेटमेंट शेअर केलं आहे. त्यात तो म्हणतो की, ''जेव्हा प्रत्येक भारतीयांचा आशीर्वाद पाठिशी असतो तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो. आपल्याला स्वत:ची बाजू मांडण्याची गरज नसते. काळ सर्व सांगतो. मी माझ्यापरीने आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे.

काय आहे सोनू सुदचं ट्विट?

'सख्त राहों में भी आसान सफर लगता है, हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है' असं कॅप्शन देऊन सोनूने त्याचं निवेदन मांडलं आहे.

माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, अनेक प्रसंगी, मी विविध ब्रॅण्डसना माझ्या कामाची फी गरजूंना दान करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. काही पाहुण्यामुळे मी गेल्या चार दिवसांपासून व्यस्त असल्याने तुमच्या सेवेत येऊ शकलो नाही. आता मी पुन्हा आलो आहे. माणुसकीसाठी माझी सेवा अशीच सुरु राहिल.” असं म्हणत सोनूने आपली बाजू मांडली आहे. आणि शेवटी “कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद” या ओळी लिहील्या आहेत.

सोनू सूदला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही समर्थन देत त्याचं कौतुक केलं आहे. “सोनू सूद तुम्हा लाखो भारतीयांचे हिरो आहात” अशा शब्दांत केजरीवाल यांनी सोनूचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे देशभरातील त्याच्या चाहत्याकडूनही सोनूला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र त्याच्यावरील आरोपांवर कितपत तथ्या आहे हे येणारा काळच सांगेल.

Related Stories

No stories found.