Bulli Bai app ची मास्टरमाईंड निघाली 'या' राज्यातील महिला, नेमकं प्रकरण काय?
देहरादून: सोशल मीडियावर अतिशय स्पष्टपणे बोलणाऱ्या 100 नामांकित मुस्लिम महिलांविरोधात उत्तराखंडमधील एका महिलेने तिच्या साथीदारासह कट रचला. तीच महिला आणि तिच्या मित्राने Bulli Bai appच्या माध्यमातून त्या महिलांबद्दल अपमानास्पद आणि असभ्य गोष्टी लिहिल्या. त्यांची बोली लावण्याइतपत त्यांची मजल गेली. या सगळ्या कटामागची मास्टरमाईंड असणाऱ्या महिलेला उत्तरखंडमध्ये आणि तिच्या एका साथीदाराला बेंगळुरू येथे अटक करण्यात आली आहे.
Bulli Bai app प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव विशाल कुमार आहे. तो 21 वर्षांचा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. विशाल हा या कटातील मुख्य आरोपी महिलेचा मित्र आहे. मुख्य आरोपी महिला आणि विशाल कुमार हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतात. आता या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
ट्रान्झिट रिमांडवर घेण्यासाठी मुंबई पोलीस कट रचणाऱ्या महिलेला उत्तराखंड न्यायालयात हजर करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांना ओळखतात. ते दोघे फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. त्यामुळे दोन्ही लिंक्सची पडताळणीही सहज झाली आहे.
नाव बदलून रचला कट
या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला Bulli Bai app शी संबंधित तीन अकाउंट चालवत होती. तर तिचा मित्र विशाल कुमार याने खालसा सुप्रीमिस्ट नावाने अकाउंट उघडले होते. जेणेकरून लोकांचा गैरसमज व्हावा आणि त्यांना असं वाटावं की, या कटामागे एक शीख व्यक्ती आहे. पण आता या संपूर्ण कटामागील सत्य उघडकीस आलं आहे.
मात्र दोन्ही आरोपींचा कट मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. 100 मुस्लीम महिलांविरुद्धचा हा कट अतिशय चतुराईने रचण्यात आला होता. ज्याच्या मागे त्या दोघांचा द्वेष आणि घाणेरडा विचार होता. उत्तराखंडमधून पकडलेल्या आरोपी महिलेला मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, आरोपी विशाल कुमारला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Bulli Bai app वर दिल्ली पोलिसांची कारवाई
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी ट्विटरला Bulli Bai app संबंधित मजकूर हटवण्यास सांगितले आहे. इतकेच नाही तर ज्या अकाऊंटने Bulli Bai app बद्दल पहिले ट्विट केले होते. त्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी ट्विटरकडून मागवली आहे. दिल्ली पोलिसांनी Bulli Bai app निर्मात्याचीही माहिती गिटहबकडून मागवली आहे. हे प्रकरण आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटकडे वर्ग करण्यात आले आहे.
Bulli Bai app अॅप नेमकं काय आहे
काही दिवसांपूर्वी Bulli Bai नावाचे एक अॅप तयार करण्यात आले होते. त्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. त्यांच्या विरोधात द्वेष पसरवला जात होता. एवढंच नव्हे तर अत्यंत त्यांच्यासंबंधी घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक हे अॅप त्याच पद्धतीने बनविण्यात आले होते जसे Sulli deal तयार करण्यात आले होते. GitHub वर Sulli deal लाँच करण्यात आलं होतं. आता Bulli Bai app देखील GitHub वर लॉन्च करण्यात आलं होतं.
शंभर महिलांना केलं गेलं टार्गेट
ट्विटर आणि फेसबुकवर दमदारपणे देशातील परिस्थितीबाबत आपली परखड मतं मांडणाऱ्या शेकडो महिलांना Bulli Bai app वर टार्गेट करण्यात आले आहे. या पीडितांमध्ये मीडियासह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्या निकृष्ट अॅप आणि प्लॅटफॉर्मवर त्यांची नावे आणि फोटो वापरण्यात येत असल्याची तक्रार या सर्व महिलांनी केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या अॅपच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी एका महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गिटहबनेही केली कारवाई
दरम्यान, GitHub ने 'Bulli Bai' वादावर Aaj Tak/India Today च्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, या अॅपमध्ये प्रथा, छळ, भेदभाव आणि हिंसाचाराला उत्तेजन देणारा कंटेट हा आमच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपरचे म्हणणे आहे की, हे प्रकरण उघडकीस येताच संबंधित यूजर्सचे खाते निलंबित करण्यात आले होते. GitHub ने या प्रकरणी चौकशी करणाऱ्या सर्व एजन्सींना सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.