Covid 19-रशिया, चीन आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली तयार करावी-राजेश टोपे

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य
Covid 19-रशिया, चीन आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली तयार करावी-राजेश टोपे
राजेश टोपे

देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसून येते आहे. अशात रशिया, चीन आणि इंग्लंड या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रशियात तर एका दिवसात 40 हजारांहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आता केंद्र सरकारने या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवलं पाहिजे असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर खबरदारीचा उपाय म्हणून नियमावलीही तयार केली पाहिजे असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. जालना या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना जगभरातील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. रशिया ,इंग्लड आणि चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच ICMR ने याबाबत नियमावली ठरवावी असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचं पहायला मिळतं आहे. त्यामुळे चीनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार सर्वप्रथम चीनमध्ये झाला होता, त्यानंतर जगभराला त्याचा सामना करावा लागला होता. ब्रिटन आणि रशियामध्येही कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. आता तिसऱ्या लाटेनेही तोंड वर काढलं असून या देशांमध्येही काही भागांत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने या देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी, प्रवाशांसाठी विशेष सूचना जारी केल्या पाहिजेत. नियमावली कठोर केली पाहिजे असंही मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका बसला आणि त्याहून भयंकर म्हणता येईल अशी होती दुसरी लाट. दुसऱ्या लाटेत हजारोंच्या संख्येने मृत्यू हे देशभरात झाले. कोरोना संकट हे आजवरचं सर्वात मोठं संकट आहे. संपूर्ण जगाला या संकटाने ग्रासलं होतं. काही देश कोरोनातून बाहेर आले आहेत. भारतात आणि महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र तिसरी लाट येऊ नये आणि आली तरी त्यासाठी सर्व तयारी असावी प्रशासनाने तयारी केली आहे. देशपातळीवरही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी कऱण्यात आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत इतर देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढणं ही बाब चिंतेची आहे. चीनमध्ये लॉकडाऊनही परत लावण्यात आला आहे. त्यामुळे चीन, रशिया आणि इंग्लंड या तीन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे असं आज राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in