'अरे, तुमच्या काय बापाचं राज्य आहे का?; जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारला इशारा

'केंद्र सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?; मरू... जीव देऊ, पण घर देणार नाही' : आव्हाडांनी डागली टीकेची तोफ
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड.

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना नोटीसा पाठवल्या असून, सात दिवसांत घरं रिकामी करण्यास सागितलं आहे. हा मुद्दा दिवसेंदिवस तापू लागला असून, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर खाली करायला सांगता. हे योग्य नाही. कळव्यात अशाच पद्धतीने घरं पाडण्यात येणार होती. ती आम्ही पाडू दिली नाहीत. आज त्या झोपड्या तशाच आहेत', असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.

मध्य रेल्वे प्रशासनाने रुळाशेजारील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना सात दिवसात घरं रिकामी करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी लढा देण्याचं आवाहन संबंधिक नागरिकांना केलं. 'केंद्र सरकार इतकं निर्दयी कसं काय असू शकतं? भाजपचं हे ठरलेलं आहे की, सर्वांना घाबरवून सोडायचं आणि निवडणूका आल्या की सांगायला येतील की आम्ही झोपड्या तोडू देणार नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली

'या लढ्याचे नेतृत्व मी करणार आहे. मुख्यमंत्र्यांना यात मध्यस्थी करावी लागेल' असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

'सर्व कागदपत्रं असताना घराच्या बाहेर जायला सांगत आहेत, यांच्या बापाचं राज्य आहे का? महाराष्ट्र सरकारचा न्याय आहे की झोपडपट्ट्यांना संरक्षण मिळायला हवं. मर जायेंगे, जान दे देंगे, घर नही देंगे. राष्ट्रवादी काँग्रेस तुमची घरं वाचवेल, असं आश्वासन आव्हाड यांनी दिलं.

'मी येऊन गेल्यानंतर बाकी नेते येतील. आता सर्व मोठे नेते लाईनने येतील. बाजूला रेल्वे ट्रॅक आहे. हा रेल्वे ट्रॅक बंद झाला, तर अख्खा भारत बंद होतो. मी 10 बाय 10 च्या घरात राहून आलोय. सार्वजनिक संडासाचा वापर मी देखील केलाय. जो डर गया वो मर गया. घाबरू नका, घरं तुटणार नाही', असंही दिलासा आव्हाडांनी यावेळी नागरिकांना दिला.

'5 लाख नागरिक यामुळे बाधित होणार आहेत. पाच लाख नागरिकांना घराच्या बाहेर काढायला तुम्हाला मिलिटरी आणावी लागेल, हे पोलिसांचं काम नाही. हे केवळ घाबरवण्यासाठी केलं आहे, असं माझं मत आहे. भाजपचं प्रत्येकवेळी ठरलेलं असतं, लोकांना घाबरवून सोडायचं. आता भाजपा प्रचाराला येईल तेव्हा बोलेल तुमची घरं वाचवणार, टाका कमळाला मतं. हे असले धंदे मी नाही केले. जेव्हा माझ्याच सरकारनं निर्णय घेतला झोपड्या पाडायचा, तेव्हा त्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करून रेल्वे बंद केली आणि न्याय घेतला', असंही आव्हाड म्हणाले.

'रक्त सांडण्याची तयारी ठेवा. हा लढा मागे राहून लढता नाही येणार. त्यांना समज द्यावी लागेल की, अंगावर आलात शिंगावर घेऊ. मी इथे आलो आहे, तर या लढ्याच नेतृत्व मी करेन. आपण सगळे मिळून लढूया... हा माझ्या एकट्याचा लढा नसणार. भाषण देऊन चाललो पुन्हा येणार नाही, असं वाटायला नको म्हणून तुम्हाला सांगतो. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील मध्यस्थी करावी लागेल. तुम्ही मतदार आहात. तुमच्याकडं रेशन कार्ड आहे. 50 वर्षे वास्तव्याचा दाखला आहे. असं असताना 'चल घराच्या बाहेर निघ, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? एवढे वर्ष झोपले होते का?', अशी टीका आव्हाडांनी केंद्र सरकारवर केली.

'तुमची घरं राष्ट्रवादी काँग्रेस वाचविणार. एका घरालाही देऊ देणार नाही. वेळ आली तर आपल्याला माहित आहे काय करायचं? असं म्हणत आव्हाडांनी लढा देण्याचं आव्हान नागरिकांना केलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in