
चीनच्या शांघाय मध्ये कोरोनाचा कहर माजला आहे. त्यामुळे तिथे सरकारने लॉकडाऊन लावलं आहे. अनेक भागांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे जगातलं एक मोठं केंद्र असलेलं शांघाय सोडून लोक जाऊ लागले आहेत. या ठिकाणी असलेली पॅकर्स आणि मूव्हर्स सारखी कंपनी आणि काही कायदेशीर फर्म यांचं म्हणणं आहे की शांघाय सोडून लोक निघून जात आहेत.
तर काही लोकांनी सोशल मीडियाद्वारे हे सांगितलं आहे की शांघायमध्ये लॉकडाऊन लागला आहे. अशात जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत त्या निर्बंधांसह तुम्ही शहर कसं सोडू शकता? याचा सल्ला काही लोक सोशल मीडियावरून देत आहेत.
शांघायची लोकसंख्या सुमारे अडीच कोटी आहे. या शहरात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. तसंच अनेक विदेशी लोक हे शांघाय मध्ये वास्तव्य करतात. मात्र कोव्हिडचे रूग्ण शांघायमध्ये वाढू लागल्याने अनेक लोकांनी शांघाय सोडून जाणंच पसंत केलं आहे. आंतराष्ट्रीय मूव्हर्स शांघाय M & T यांचे संस्थापक मायकल फाऊंग यांनी म्हटलं आहे की आहे आम्हाला दर महिन्याला शिफ्टिंगसाठी साधारण ३० ते ४० लोक सांगायाचे. या महिन्यात ही संख्या चांगलीच वाढली आहे.
एजेन्सीने दिलेल्या वृत्तानुसार शांघायमध्ये कोव्हिडचे रूग्ण वाढू लागले आहेत आणि इतरही संकटं वाढत आहेत. अनेक लोकांना दोन वेळचं जेवणही नीट मिळत नाही. १० विदेशी नागरिकांनी हे सांगितलं की त्यांना जेवण मिळवण्यासाठीही बरीच वणवण करावी लागली. तसंच अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर आमच्या मनात दरवेळी ही भीत असते की आपल्या घरातला कुणी सदस्य पॉझिटिव्ह झाला तर काय करायचं?
कोरोनाचा रूग्ण आढळला तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे कुटुंबापासून वेगळं होण्याची भीतीही असतेच. शांघायमधली एक विदेशी नागरीक जेनिफर ली ने सांगितलं लॉकडाऊन लागण्याच्या आधी मी हवं ते करू शकत होते. आता मात्र बंधनं लागली आहेत. त्यामुळे मला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मी सत्तेची ताकद काय असते ती अनुभवली आहे. मला आता हवं ते करण्याची मुभा नाही. मी मागच्या ११ वर्षांपासून या ठिकाणी राहते आहे. मात्र आता मला आता या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही.
शहर सोडणाऱ्या लोकांनी सांगितलं त्यांना एअरपोर्टपर्यंत पोहचण्यासाठीही भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. टॅक्सीने एअरपोर्ट पर्यंत पोहण्यासाठी जिथे ३० डॉलर्स मोजावे लागत होते तिथे आता ५०० डॉलर्स मोजावे लागत आहेत. एवढंच नाही तर काही फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक विमानतळावरही अडकून पडले आहेत.