'मित्रांना भेटण्याची उत्सुकता अन्...'; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

राज्यभरात शाळा सुरू : मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद
'मित्रांना भेटण्याची उत्सुकता अन्...'; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे
आजपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत...

कोरोनाच्या संकटावर मात करत राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. दीड वर्षांनंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या असून, पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला. तसंच पालकांनाही खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी' या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. 

'शाळेची पुन्हा घंटा वाजली आहे. मला आज माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत. शिक्षकांना आणि पालकांना आवाहन आहे की, आपल्या विद्यार्थ्यांची आणि पाल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 5 मुद्दे

- मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तकं, गणवेश मिळायचे. आताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे.

- शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणं कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचं वय घडण्याचं असतं. आज आपण मुलांच्या विकासाचं, प्रगतीचं दार उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

- मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरं वाटत नसेल, तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वांनी काम करावं.

- शाळांच्या खोल्यांची दारं बंद नको. हवा खेळती हवी. निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करताना देखील काळजी घ्या. मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणं, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी.

- कोरोनानं आपल्याला बरेच काही शिकवलं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in