CM Thackeray नी जोडले हात म्हणाले 'घरी जा..', शिवसैनिक म्हणतात 'प्रसाद दिल्याशिवाय जाणार नाही'

CM Thackeray and Shivsainik: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर थांबलेल्या शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं आहे. पाहा यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले.
CM Thackeray नी जोडले हात म्हणाले 'घरी जा..', शिवसैनिक म्हणतात 'प्रसाद दिल्याशिवाय जाणार नाही'
cm uddhav thackeray appealed shiv sainiks to go home navneet ravi rana matoshree hanuman chalisa mumbai varsha bungalow

मुंबई: 'इकडे कोणी हिंमत करणार नाही, तुम्ही घरी जा...' असं आवाहन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना केलं आहे. 'मातोश्री'च्या बाहेर चालत येत मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. नवनीत राणा आणि रवी राणा हे हनुमान चालीसाच्या पठणासाठी मातोश्रीबाहेर येणार असल्याचं समजताच शिवसैनिकांनी गेल्या अनेक तासांपासून मातोश्रीबाहेर तुफान गर्दी केली आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा त्यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा हे उद्या (22 एप्रिल) 'मातोश्री'च्या बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक हे सकाळपासूनच आक्रमक झाले आहेत आणि गेले अनेक तास ते मातोश्री बाहेर ठिय्या देऊन बसले आहेत.

राणा दाम्पत्य थेट मातोश्रीवर धडकणार असल्याचं समजताच शिवसैनिक हे मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमा झाले. तेव्हापासून रात्री उशिरापर्यंत शिवसैनिक हे मातोश्रीबाहेरच आहेत.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्री बाहेर जमल्याचं समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानातून मातोश्रीवर आले. यावेळी ते मातोश्रीच्या गेटपासून चालत पुढे गेले आणि शिवसैनिकांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठकही पार पडली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा 'वर्षा'वर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी बाहेर असणाऱ्या शिवसैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिवसैनिकांना म्हणाले की, 'इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही घरी जा.. तुम्ही दिवसभर इकडे आहात.. तुम्ही प्लीज घरी जा..'

यावेळी काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितंल की, 'साहेब इथेच थांबणार आम्ही.. काळजी नसावी, आम्ही रात्रभर राहू इथे. प्रसाद दिल्याशिवाय जाणार नाही आम्ही.. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या साहेब. आम्ही आहोत साहेब...' यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हात जोडून सर्व शिवसैनिकांचे आभार मानले.

राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांवर काय टीका केली?

दरम्यान, राणा दाम्पत्याने आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर तुफान टीका केली. 'माझ्या महाराष्ट्राला जो शनी आणि साडेसाती लागली आहे.. एक व्यक्ती तो महाराष्ट्राचं नेतृत्व करतो.. मुख्यमंत्री आहेत.. प्रथम नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्राचे. जर असं वाटत असेल की, ते जर दोन ते अडीच वर्ष ऑफिसमध्येच जात नसतील.. समजा, एखादा साधा व्यक्ती दोन वर्ष आपल्या ऑफिसमध्ये गेला नाही तर मला वाटतं की, कोणी त्याला पगारही देत नाही. हे तर बिनकाम पगारी आमचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात.'

'ज्यांनी काहीही काम केलेलं नाही. एवढं असूनही ते अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कायम आहेत. त्यांनी आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटात टाकलं आहे. बेरोजगारांना संकटात टाकलं आहे. रोजगार नाहीए. लोडशेडिंग एवढी वाढली आहे की, आमचे जे मंत्री आहेत.. ते म्हणतायेत आपलं महाराष्ट्र अंधारात गेला तरी कोणालाही धक्का बसू नये. ही अवस्था आपली, त्या खात्याची आहे.' असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली.

Related Stories

No stories found.