
मुंबई: कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना देखील टोले लगावले आहेत. 'सगळीकडे एकाच व्यक्तीचे फोटो.. सरपंचाला पण एकच फोटो आणि पंतप्रधानपदाला पण एकच फोटो.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका केली आहे.
पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले:
'तुम्हाला जर हा हिंदूहृदयसम्राटांबद्दल एवढं प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. ज्या हिंदूहृदयसम्राटांबाबत तुम्ही एवढं बोलतात. त्यांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो.. आजसुद्धा ती खोली तशीच आहे. त्या खोलीत अमित शाहांनी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं? याचं उत्तर तुम्ही का नाही देत?'
'हिंदूहृदयसम्राटांबद्दल एवढं प्रेम आहे ना.. मग नवी मुंबईच्या विमानतळ होतंय त्याला हिंदूहृदयसम्राटांचं नाव देण्यासाठी तुमचा विरोध का?'
'शिवसेना 1966 साली जन्माला आली तेव्हापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, रंग बदलला ना विचार बदलले. ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात, होर्डिंगवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच आहेत. पण तुमचा जन्म झाला जनसंघ तेव्हाचा तुमचा झेडा आठवा.'
'त्यानंतर तुम्ही गेलात जनता पक्षात, त्यानंतर तुम्ही भाजप स्थापन केली. तेव्हा तुमची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेनाप्रमुखांनी एक वेगळी भगवी दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की, या दिशेने गेलो तर दिल्लीत पोहचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्वावर आलात.'
'आमच्या सगळ्या होर्डिंगवर बाळासाहेब आहेतच. तुमच्या किती होर्डिंगवर अटलजी आणि आडवाणी आहेत? आता कुठे आहेत अडवाणी.. सरपंचाला पण एकच फोटो आणि पंतप्रधानपदाला पण एकच फोटो. म्हणजे आम्हाला कळतच नाही की, हे देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे.' अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे.
'तुमची फसवी उज्ज्वला योजना सुरु आहे का?'
'काल फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी सगळ्यांना रेशन दिलं. दिलं ना जरुर दिलं. रेशन दिलं पण फडणवीस साहेब ते शिजवायचं की, कच्चं खायचं? कारण शिजवायला गेलं तर गॅसच्या किंमीत काय झालेल्या आहेत. तुमची फसवी उज्ज्वला योजना सुरु आहे का? रेशन दिलं ते पण ठीक आहे. पण ते सुद्धा जनतेच्या पैशाने दिलं आहे. तुमच्या पैशाने नाही.'
'कालच्या संपूर्ण भाषणामध्ये महागाईबद्दल काही बोलले का? गॅस, पेट्र्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. काय सांगितलं तिथे भाजपशासित प्रदेशात किंमती कमी केल्या. या सरकारने पण केलं असतं तर पेट्रोल स्वस्त मिळालं असतं. आम्ही कमी करत जायचं आणि तुम्ही वाढवत जायचं. एक तर आमचा जीएसटी तुम्ही देत नाहीत.' अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.