CM Uddhav Thackeray Speech: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेतील भाषण जसंच्या तसं...

वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील केलेलं भाषण जसंच्या तसं...
cm uddhav thackeray full speech maharashtra legislative assembly attack on bjp
cm uddhav thackeray full speech maharashtra legislative assembly attack on bjp

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (25 मार्च) विधानसभेत बोलताना भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी विधानसभेत जवळजवळ राजकीय भाषणच केलं. पाहा या सगळ्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर कसा निशाणा साधला.

वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतील संपूर्ण भाषण:

सुधीरभाऊ तुम्ही दरवेळेला छान काही तरी बोलता आणि मला छान काही तरी उत्तर द्यावं लागतं. तुम्ही असं म्हणालात की, हे शासन कोणाचं आहे तर हे बेवड्यांचं शासन आहे. आपल्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याला तुम्ही मद्यराष्ट्र म्हणालात. आता वाईन जी आहे ती काही किराणा मालाच्या दुकानात किंवा वाण्याच्या दुकानात नाही मिळत.

जिथे सुपरमार्केट आहे तिथे वाईन मिळते. आपण नेहमी चंद्रपूरचे मुद्दे मांडता. आपल्या बाजूला मध्यप्रदेश आहे. त्यांची जी काही आकडेवारी आहे ती मी विचारतो मग त्याला मद्यप्रदेश म्हणणार का तुम्ही?

(त्यांचा संबंध नाहीए.. मुनगंटीवारांकडून उत्तर)

संबंध नाहीए.. पण त्यांनी जे काही केलं आहे. असं नाहीए. तुम्ही.. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो.. असं नाही करायचं.

देशात एक लाख लोकसंख्येचा मागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. कर्नाटक किती आहेत कोणाचं सरकार आहे.. तिकडे 7.10, मध्यप्रदेश 5.07 आता याचं उत्तर द्या.. उत्तरप्रदेश तिकडे 2.60 तामिळनाडू 9.43 हे सगळं पाहिल्यानंतर लगेच आपल्या राज्याची बदनामी करुन टाकायची. हे योग्य नाही.

तुम्ही आमच्यावर टीका करा. पण ज्या महाराष्ट्रात काय विकास झाला ते राज्यपाल सांगत होते ते तुम्ही समोर येऊ देत नाही. पण असं एक-एक नावं देऊन तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करता आहात हे योग्य नाही. या सगळ्याची दखल नागरिक घेत असतात.

मी टिकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मी कसा आहे हे लोकांना माहिती आहे, पण बदनामी कोणत्या थराला जाऊन करायची. नवाब मलिकांचा राजीनामा. जर दोषी असतील. संबंध असतील, बघूया काय करायचं. तुम्ही आरोप करायचे. तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू ते सत्य वाटायला लागतं. एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की, केंद्रीय तपास यंत्रणा एवढ्या पोकळ झाल्या आहेत की, नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबई आणि देशात सगळीकडे फिरतोय आणि चार-पाच वेळा निवडून येतोय. मंत्री बनतोय आणि केंद्रातील यंत्रणांना माहितीच नाही.

केंद्रातील यंत्रणा काय करतात, थाळ्या वाजवा. दिवे पेटवा. दिवे घालवा हे करतात का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. तिरंदाज लक्ष्यभेद करतो. आता काय होतंय केंद्रीय यंत्रणा तो बाण आहेत. त्यांना हातात पकडून लक्ष्यावर खुपसलं जातंय. हे तुझं लक्ष्य आणि सगळंच. देवेंद्र फडणवीसांना केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती तुम्ही ईडीकडे दिली. ईडीकडे इतके बेकार लोक आहेत का तिकडे.

माहिती देणारे तुम्हीच. आरोप करणारे तुम्हीच. चौकशी करणारे तुम्हीच. त्याप्रमाणे शिक्षाही हेच करतात. अशा केसेस तयार केल्यावर न्यायालय तरी काय करणार. सगळ्या यंत्रणा अशा राबवतात की, ती ईडी आहे की घरगडी आहे, हेच कळत नाहीये.

मी अधिवेशनात अधूनमधून येत होतो. पूर्वी एक दाऊद शूज होते. तेही घोटाळ्यात गेला. पण त्याची एजन्सी कुणी घेतलीये का? हा दाऊद आहे कुठे? एखादा विषय निवडणुकीसाठी कितीकाळ घेणार आहात. इतकी वर्ष राम मंदिराचा विषय घेतला, आता यापुढे दाऊदचा घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार आहात का? हे दाऊद कुठेय कुणाला माहितीये का?

गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होत की, दाऊदला फरफटत आणू. आता त्याच्यामागे फरफटत चाललो आहोत. त्याचे हस्तक शोधतोय. ओबामांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? ओबामांनी निवडणुकीत त्याचा वापर केला होता. ओबामांनी कुणाची वाट नाही बघितली. पाकिस्तान ढगाआडून हेलिकॉप्टर पाठवायचे असा थिल्लरपणा नाही केला. त्यांनी जवान पाठवले आणि लादेनला घरात घुसून मारलं. याला म्हणतात मर्दपणा.

जसं ओबामांनी ओसामाला मारलं, तर तुम्ही दाऊदला मारा. काहीही न करता नुसतं, आरोप करता. मी प्रामाणिकपणे सांगतोय की, आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात आहोत. त्याबद्दल दुमत नाही. मलिकांचा राजीनामा मागत आहात. अफजल गुरूला फाशीला मेहबुबा मुफ्तींनी विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन केली.

'आता जे काही चाललं आहे की, एकेक गोष्टी बोलून मग केल्या जातात. आता मध्ये.. हर्षवर्धन पाटील जे आधी तुमच्याकडे होते. त्यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचं औषध घेतलं. तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव काही त्यांनी कानात नाही सांगितलाय तर एका सभेत सांगितला आहे. तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवरच निशाणा साधला.

मला खरं सांगा.. आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत. आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत. पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?

आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जी काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करताय.. ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे. की, एकमेकांच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे मर्द असशील तर मर्दासारखा ये अंगावर. बघतो तू आहे आणि मी आहे.

तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करुन.. म्हणजे महाभारतात शिखंडीचा उल्लेख आहे. तो शिखंडी कोण होता हे मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण आहे. कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत. नामर्दपणा म्हणतात.'

'हे यंत्रणा वापरायच्या, कुटुंबीयांना बदनाम करायचं. धाडी टाकायचा. हे काय आहे? मागे नितीन गडकरी बोलले होते. की, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. म्हणजे जसं ईडीचं काम मनी लाँड्रिंग असतं तुमच्याकडे काय ह्यूमन लाँड्रिंगचं काम आहे का?'

'म्हणजे बरबटलेला माणूस घ्यायचा त्याला म्हैसूर सँडल सोप लावायचा आणि छान अत्तर वैगरे लावून दाखवयचा हा बघा कसा झाला सुंदर. हे ह्यूमन लाँड्रिंग तुम्ही सुरु केलेलं आहे का?'

'हे असं समजू नका की, कोण बघत नाहीए, कोणाच्या लक्षात येत नाहीए. कारण जसं आपल्या पोरांचे चाळे, थेरं बघू न शकणारा त्यांचा पिता आंधळा ध्रृतराष्ट्र होता तसा हा ध्रृतराष्ट्र नाहीए. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे.'

'या अशा वाटेला जाऊ नका यातून कोणाचं काहीही होणार नाही. कोणाचंच भलं होणार नाही. म्हणून मला वाटतं की, हे सगळं जे काही चाललं आहे ना.. मी घाबरलोय म्हणून नाही सांगत.'

'खरं म्हणजे ही संधी आहे. अनेकांची इथे येण्याची स्वप्न असतात. आपल्याला संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं करायचं की माती करायची हे ठरवा. काय असतील ना मतभेद तर सांगा, सूचना असतील सांगा. कोण आमच्यात गुन्हेगार असेल जरुर सांगा. पण उगाच काही तरी बदनामी करु नका.'

'तुम्हाला सत्ता पाहिजे ना.. म्हणून तुम्ही हे ताण-तणाव कुटुंबीयांना तणावाखाली ठेवायचं, मग याला अटक करायची.. त्याला बेलच मिळू द्यायचा नाही. हे सगळं सुरु आहे ना. चला मग मी या सगळ्यांच्या समोर सांगतो मी तुम्हाला सत्ता पाहिजे ना. तर उगाच तुम्ही काही गोष्टी करु नका. पेनड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका... मी म्हणतो मी तुमच्यासोबत येतो.. मी येतो सोबत.. सत्तेसाठी नाही येत. तुम्ही आता जे चाळे केलेले आहेत. सगळे माझटाच. या टाचेला काही मी घाबरत नाही.'

'मी तुमच्या बरोबर येतो. टाका मला तुरुंगात. माझ्यावर यायचं ना.. या ना मग.. कुटुंबाची का बदनामी करताय. आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केलीय? कधी तुमच्या कुटुंबीयांच्या काही भानगडी असतील आहे असं म्हणत नाही... पण तसं काही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे? मी येतो तुमच्या बरोबर.. मला टाका तुरुंगात.'

'एवढाच का जर तुमचा जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. थोडसं मग मी भावनिक बोलतो. तुरुंग कोणता आर्थर रोड, तिहार वैगरे नाही. जसं बाबरी मशिदीच्या इथे राम जन्मभूमी होती तसं जर का कृष्ण जन्मभूमीचा शोध लागला असेल तर तिथे जे तुरुंग होतं त्या तुरुंगात मला टाका.'

'मी कृष्णाचा अवतार नाहीए. मी कदाचित देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेन पण त्या तुरुंगात मी कृष्ण जन्माची वाट बघेन. पण मी जसं सांगतोय की, मी कृष्ण नाहीए. तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की, तुम्ही कंस नाही आहात.'

'तुम्ही म्हणता बाळासाहेबांना काय उत्तर देणार.. मग मी विचारतोय. बाळासाहेबांनी तुमच्या ज्या नेत्यांना वाचवलं ते बाळासाहेबांना काय उत्तर देणार? त्यावेळेला सगळे सांगत होते.. देशभरातून हे नको.. हे नको.. तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्यामागे उभे राहिले होते. हे होता कामा नये.. हे तिकडेच राहिले पाहिजे. काय उत्तर देणार?'

'2014 मध्ये तुम्ही युती तोडलीत. तेव्हाही मी हिंदू होतो. आज जर का तुम्हाला वाटत असेल की मी हिंदुत्वावरुन फारकत घेतली असेल तर मी आजही हिंदूच आहे आणि मी काही लपवलेलं नाही. हे माझ्या सर्व सहकाऱ्यांना माहिती आहे.'

'तुरुंगात टाकणार असाल तर सगळी जबाबदारी मी घेतो. माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी देखील मी घेतो. सगळ्यांच्या वतीने पाप स्वीकारायला मी तयार आहे. मला टाका तुरुंगात पण जे शिवसैनिक बाकी सगळ्यांनी जेव्हा शेपट्या घातल्या होत्या जेव्हा 92-93 साली जिवावर उदार होऊन जी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छळू नका.

'काही जण यंत्रणांचे दलाल आहेत की प्रवक्ते आहेत? अनिल देशमुख तुरुंगात जाणार.. गेले तुरुंगात.. नवाब मलिक तुरुंगात जाणार.. आता अनिल परब तुरुंगात जाणार.. उद्या किशोरी पेडणेकर तुरुंगात टाकणार. हे काय आहे? निदान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित तरी केली होती. ही अघोषित आणीबाणी.. एवढा डरपोकपणा त्यांच्यात नव्हता. चांगली-वाईट हा वेगळा प्रश्न. पण एक धारिष्ट लागतं ते त्यांच्यात होतं.' असं घणाघाती भाषण उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in