"कोरोनावर बोलण्याची गरज पडू नये, पण..."; आजारपणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जनतेसमोर

मुंबईकरांना सरकारकडून नववर्षाची भेट! 500 फुटाच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
"कोरोनावर बोलण्याची गरज पडू नये, पण..."; आजारपणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच जनतेसमोर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई महापालिका हद्दीतील 500 फुटांच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाची आज घोषणा करण्यात आली. लवकरच या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथमच जनतेसमोर आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील विकास कामांबरोबरच कोरोनाबद्दलही सूचक भाष्य केलं.

"मी टीव्ही दिसल्यावर अनेकांना असं वाटलं असेल की मी फक्त कोरोनावर बोलणार, पण मी आज कोरोनावर बोलणार नाहीये. आवश्यकता पडू नये, पण गरज पडली तर बोलेन", असं मुख्यमंत्री संवादाच्या सुरुवातीलाच म्हणाले.

"आजचा हा विषय फार महत्त्वाचा आहे. मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला व्यक्तीशः फार आनंद होत आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असताना आपली पाळंमुळं विसरून चालणार नाही. 1966 पासून मुंबई जन्माला आलेली शिवसेना ही आज कित्येक वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळत आहे. ही आता आमची चौथी पिढी आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते. नंतर शिवसेनाप्रमुखांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. मी तुमच्यासमोर आहे आणि चौथी पिढी म्हणजे आदित्य", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.

"जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलं, तेच आज आम्ही पुढे नेत आहोत. आज मला तुमच्यासारखे शासन आणि संघटनेतील सोबती मिळाले आहेत. शिवसेनाप्रमुख स्वतः रस्त्यांची, नालेसफाईची आणि सुशोभिकरणाच्या कामांची पाहणी करायचे, ते दिवस मला आज आठवत आहेत. हे पाहत मी मोठा झालो. मी सुद्धा नंतरच्या काळात कामाची पाहणी सुरू केली. अनेकवेळा नाल्यात उतरून कामाची पाहणी केलीये. आता माझा ताण आदित्यने कमी केला आहे. आदित्यही रात्री-अपरात्री अधिकारी नगरसेवकांना सोबत घेऊन रस्ते, नालेसफाईच्या कामांची पाहणी करतोय", असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

"नागरिकांना सुविधा तर द्यायच्याच आहेत. मेट्रो असो, रस्त्याची कामं, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, पण एक विचार असा डोक्यात आला; मुंबईकर म्हणजे फक्त करच भरायचे का? मुंबईकर दोन्ही करांनी देतो आणि त्याला मिळतंय काय?", असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

"मला स्वतःला हे मान्य नाहीये. बऱ्याचदा आपण असं म्हणतो. कामं केल्याची आपण मोठंमोठी होर्डिग्ज लावतो. आम्ही हे केलं असं आपण म्हणतो, पण तो पैसा जनतेचा आहे. आपण काही मोठं केलेलं नाही. जे काम केलं त्याची जाहिरात करायची मला स्वतःला पटत नाही. पण शेवटी राजकारण म्हटलं की, आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते. बघा आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही असं करू, आम्ही तसं करू. यालाच राजकारण म्हणतात."

"अनेकजण असे असतात आणि आहेत. ते लोकांना तारे तोडून आणू असं सांगतात. आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. ज्या गोष्टी होण्यासारख्या नसतात, त्या सांगितल्या जातात. लोक फसतात आणि मतं देऊन मोकळे होतात. पाच वर्षानंतर लोक विचारतात आणि मग सांगतात असं बोलावं लागतं. पण, निवडणुकीत लोक त्यांनाच तारे दाखवतात. अशा गोष्टी आम्ही केल्या नाहीत आणि करणारही नाही."

"शिवसेनाप्रमुखांनी पक्षाला एक परंपरा आखून दिलेली आहे. एक खोटं बोलायचं नाही. जे जमणार असेल, तेच वचन द्यायचं. जे जमणार नसेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी पडणार असेल, तरीही खोटं वचन द्यायचं नाही. ही आपली परंपरा आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. 2017ला शिवसेनेनं वचननामा जाहीर केला होता. त्यातील बहुतांश वचन पुर्ण केली आहेत. त्यातील 500 फुटांच्या आतील मालमत्ता कर रद्द करण्याचं वचन राहिलं होतं. हा निर्णय घेण्यात ज्यांची भूमिका राहिली आहे, त्या सगळ्यांचे मुंबईकरांच्यावतीने आभार मानतो. या निर्णयाबद्दल मी खूप समाधानी आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in