
मुंबई: शिवसेना संपर्क अभियानाला आजपासून (14 मे) सुरुवात झाली. याच सभेत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना भाजपवर तुफान टीका केली आहे. याचवेळी त्यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
'कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं. कोणाच्या तरी हातात भोंगा द्यायचा. कोणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार. आम्ही बोंबलायला तयार. मग हे जाणार आणि टॉमेटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार.' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'या सभेत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. BKC च्या मैदानावर शिवसेनेच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेला तुफान गर्दी आहे. याच सभेत उद्धव ठाकरे हे तब्बल दोन वर्षांनंतर जाहीर सभेत बोलणार आहेत. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायेत.'
'काश्मिरी पंडित राहुल भट्ट याच्यावर सरकारी कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या. काय करायचं आता... त्या कार्यालयासमोर हनुमान चालीसा पढायचा आता? का घंटा मोर्चा काढायचा तिकडे? अतिरेकी येतायेत महसूल कार्यालयात घुसतात आणि गोळ्या घालून पसार होतायेत. काश्मिरी पंडीत म्हणत आहेत की, इकडे आमचा बळीचा बकरा केला जात आहे. मग हे तुमच्या काश्मीर फाइल्सचं पुढचं पान आहे का?'
'संभाजीनगरमध्ये जे काही घडलं. होय मी संभाजीनगर म्हणतो.. नामांतर करण्याची गरज काय आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो ओवेसी गेला आणि त्या औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवून आला. हे यांचं जे काही चाललंय ना यांची A टीम B टीम C टीम..'
'कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं. कोणाच्या तरी हातात भोंगा द्यायचा. कोणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार. आम्ही बोंबलायला तयार. मग हे जाणार आणि टॉमेटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.'
'बरं सुरक्षा किती तर झेड प्लस. कोण देतंय तर केंद्र सरकार. कोणाला देतंय तर या टिनपाटांना. तिकडे काश्मिरी पंडिताना सुरक्षा नाही पण इथे भोकं पडलेल्या टिनपाटांना सुरक्षा देतायेत.' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.