Coal Crisis : विजेची मागणी वाढली, देशभरात कोळशाचा तुटवडा; 657 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द

coal shortage in Maharashtra, UP, delhi, punjab : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांत वीजटंचाईचं संकट
Coal Crisis : विजेची मागणी वाढली, देशभरात कोळशाचा तुटवडा; 657 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द
Power crisis in India due to shortage of coal, trains got cancelled

coal shortage update : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्यानं भारनियमनाचं संकट गडद होऊ लागलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर जाऊन पोहोचला असून, विजेची मागणी वाढली आहे. मात्र, कोळसा टंचाई निर्माण झाल्यानं अनेक राज्यांत सात ते आठ तासांचं भारनियमन केलं जात आहे. दरम्यान, कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल ६५७ पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली यासह इतर काही राज्य वीजटंचाईचा सामना करत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये भारनियमन केलं जात असून, तापमान वाढल्यानं विजेची मागणी वाढली, मात्र, अपुऱ्या प्रमाणात कोळसा पुरवठा होत असल्यानं विजेचा पुरवठा मर्यादित स्वरूपात होत आहे.

औष्णिक वीज निर्मिती केंद्रांकडे कोळशाचा साठा कमी असल्याचं सांगितलं जात असून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, "देशातील केंद्रांकडे २२ मिलियन टन कोळसा आहे. जो १० दिवसांपर्यंत पुरेल आणि सातत्याने कोळशाचा पुरवठा केला जात आहे."

कोणत्या राज्यात काय आहे स्थिती?

महाराष्ट्र (Maharashtra) : राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत दिलेल्या गेलेल्या माहितीनुसार राज्यात २५ हजार मेगावॅट विजेची गरज आहे, मात्र २१ ते २२ हजार मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. राज्य सरकारने केंद्रीय विद्युत कायदा आणि एमईआरसी कायद्यानुसार अदानी पॉवर (APML) आणि जेएसडब्ल्यू (JSW) यांना नोटीस बजावली आहे. काही भागात भारनियमन सुरू झालं होतं. मात्र, नंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. असं असलं तरी अनेक भागात वीज पुरवठा खंडित होत आहे.

दिल्ली (Delhi) : दिल्ली सरकारने गुरुवारी वीज पुरवठा करणाऱ्या वीज निर्मिती केंद्रातील अपुऱ्या कोळशाच्या साठ्याबद्दल चिंता व्यक्त केली. यासंदर्भात दिल्ली सरकारने केंद्र सरकारलाही पत्र पाठवलं असून, पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दादरी आणि झज्जर येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे दोन्ही केंद्र दिल्लीला वीज पुरवठा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहेत. मात्र, सध्या या केंद्रात खूप कमी कोळसा शिल्लक आहे.

हरयाणा : वीज निर्मिती केंद्रांमध्ये खूप कमी कोळसा शिल्लक असल्याची स्थिती हरयाणातही आहे. त्यामुळे हरयाणातही वीज संकट गहिरं झालं आहे. राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता हरयाणा सरकार छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यातून अतिरिक्त वीज घेणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री रंजित सिंह यांनी ही माहिती दिली. अदानी पॉवरकडून १२००-१४०० मेगावॅट वीज घेतली जाणार आहे. तर छत्तीसगढकडून ३५० मेगावॅट आणि मध्य प्रदेशकडून १५० मेगावॅट वीज हरयाणा घेणार आहे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) : उत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडे एक चतुर्थांशच कोळशाचा साठा शिल्लक आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात तापमान वाढीमुळे विजेची मागणी वाढली. त्यामुळे एप्रिलमध्ये विजेची मागणी मागील ३८ वर्षात पहिल्यांदाच उच्चांकी पातळीवर पोहोचली. उत्तर प्रदेश वीज नियामक मंडळाकडे नियमानुसार जितका कोळसा साठा असायला हवा, त्याच्या केवळ २६ टक्केच शिल्लक आहे.

बिहार (Bihar) : इतर राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. बिहार सरकारही वीज पुरवठ्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करत आहे. ऊर्जामंत्री ब्रिजेश प्रसाद यादव यांनी सांगितलं की, पुढील एक दोन दिवसांत एक हजार मेगावॅट विजेचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत.

झारखंड (Jharkhand) : झारखंडमध्ये विज पुरवठा करणाऱ्या केंद्रांमधील वीज निर्मिती घटली आहे. त्यामुळे राज्यात भारनियम सुरू झालं आहे. दिवसभरात ३ ते ४ तास भारनियम सुरू असून, यामुळे व्यवहारांवर परिणाम होऊ लागला आहे.

पंजाब (Punjab) : पंजाबमध्ये वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. यामुळे पंजाबमध्ये भारनियमन सुरू झालं आहे. भारनियमन बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांची भेट घेऊन वीज टंचाई संदर्भातील प्रश्न मांडले आहेत.

६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द

विजेची वाढती मागणी आणि आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यांकडून कोळशाची मागणी होऊ लागली आहे. यासंदर्भात राज्यांकडून केंद्राकडे तगादा लावला जात असून, कोळशाचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी केंद्राने तब्बल ६५७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या. वीज निर्मिती केंद्रांपर्यंत कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्राने दोन दिवसांत ६५७ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करून कोळशाच्या मालगाड्यांना वाट करून द्यावी लागली. शुक्रवारीही ४२ प्रवासी रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला.

Related Stories

No stories found.