
दररोज वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे उघडकीस येत असून, इन्स्टाग्रामवरून एका विद्यार्थ्याने मुलगी बनून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयीन तरुणाला अटक केली. या तरुणाने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावे अकाऊंट बनवलं होतं आणि मुलींशी संपर्क करून त्यांचे न्यूड फोटो मागवायचा.
बंगळुरू येथे पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला १४ जानेवारी अटक केली. प्रपंच नचप्पा असं या तरुणाचं नाव असून, फ्रेझर टाऊन भागात तो राहतो. प्रपंचने लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावे फेक अकाऊंट सुरू केलं.
प्रतिक्षा बोहरा या नावाने त्याने सप्टेंबर २०२१ रोजी फेक अकाऊंट सुरू केलं. लेस्बियन असल्याचं त्याने अकाऊंटच्या माध्यमातून दाखवलं आणि आपण पार्टनरच्या शोधात असल्याचाही उल्लेख केला होता.
प्रपंचने या अकाऊंटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या महाविद्यालयीन तरुणींचा विश्वास संपादन केला. मेसेजवरून तो त्यांच्याशी बोलायचा. नंतर या मुलींना त्यांचे विवस्त्र फोटो पाठवायला सांगायचा. मुलींनी फोटो पाठवल्यानंतर तो हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा.
एका पीडितेनं पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा धक्कायदायक प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपण मॉडेंलिग क्षेत्रात असून, तुला मॉडेल बनायचं असेल तर मदत करू शकतो, असं नचप्पाने पीडितेला सांगितलं होतं. त्याने ३० ते ४० महाविद्यालयीन तरुणींकडून पैसे उकळल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लेस्बियन रिलेशनशिपसाठी पार्टनर शोधत असल्याचं आरोपीने पीडितेला सांगितलं होतं.
पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने मुलीचे काही न्यूड फोटो पीडितेला पाठवले. हे फोटो स्वतःचे असल्याचं त्याने पीडितेला सांगितलं. जर तू न्यूड फोटो पाठवले तर प्रत्येक फोटोसाठी ४ हजार रुपये देऊ असं त्याने पीडितेला सांगितलं. त्यानंतर पीडितेनं नचप्पाला विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
मात्र, हे ट्रॅप असल्याचं पीडितेच्या लक्षात आलं आणि तिने त्याला ब्लॉक केलं. मात्र, नचप्पाने दुसरं अकाऊंट ओपन करून तिला मेसेज केला आणि पैशाची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर आपण हे फोटो व्हायरल करू, अशी धमकीही त्याने दिली.
या प्रकारानंतर पीडितेनं पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी नचप्पाचं ठिकाण शोधलं आणि त्याला घरातून अटक केली. नचप्पाने प्रत्येक पीडित तरुणीकडून ४ हजार ते १० हजाराच्या आसपास पैसे उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. नचप्पा बी.एससीचं शिक्षण घेत आहे.