'लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय... येणारं सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही..', फडणवीस असं का म्हणाले?

'लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय... येणारं सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही..', फडणवीस असं का म्हणाले?
coming government will not keep any opposition why did devendra fadnavis say that vidhansabha shiv sena vs bjp(फोटो सौजन्य: विधानसभा टीव्ही)

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या परिसरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे जात असताना 'म्यॉव म्यॉव' आवाज करत टिंगल केली होती. ज्याचे पडसाद आज (27 डिसेंबर) सभागृहात उमटले. या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं होतं. मात्र, त्यांचा हाच मुद्दा खोडून काढण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तेवढ्याच आक्रमकपणे आपली बाजू मांडली.

'आमच्या सदस्याला निलंबित करण्यासाठीच सरकारकडून हा डाव रचण्यात आला आहे. पण लक्षात ठेवा.. एकदा पायंडा पाडला तर यानंतर लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय येणारं सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि या लोकशाहीची हत्या होईल.' असं म्हणत फडणवीसांनी सरकावरच टीका केली.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

'आता असं वाटतंय की, ठरवून सगळं करायचं.. १२ निलंबित करायचे मग अजून निलंबित करायचे. हे दिसतंय. आम्हाला हरकत नाही. आम्ही लोकशाहीत लढणारे लोकं आहोत रडणारे लोकं नाही. या ठिकाणी नितेश राणे यांच्यासंदर्भात जो काही विषय उपस्थित झाला. त्याबाबत आम्ही आमची भूमिका पहिलेच स्पष्ट केली आणि सांगितलं की, कुठल्याही पक्षाच्या सदस्याने असं वागू नये. पण आता भास्करराव तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगतो.'

'या सभागृहात भास्कररावांसहित आम्ही सगळे इथे बसायचो आणि भुजबळसाहेब तिथे आले की, त्यांना हुप हुप करुन चिडवणाऱ्यांमध्ये भास्कररावही होते. हे पाहिलंय या सभागृहाने. त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण जर हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. याचं कारण सांगतो. तुम्ही आमचे 12 लोकं सस्पेंड केले. आम्ही न्यायालयात गेलो. या सभागृहाच्या वर न्यायालयाचा हस्तक्षेप व्हावा या मताचे आम्ही नाही आहोत. पण अध्यक्ष महोदय आमच्यावर ती वेळ तुम्ही आणताय.'

'या ठिकाणी कायदा पाळला जात नाही, संविधान पाळलं जात नाही. मनमानीपणे एक-एक वर्ष निलंबित करायचं. हे जे काही चाललंय आहे ते बरोबर नाही.'

'ज्या क्षणी मला समजलं नितेश राणे काही तरी बोलले तेव्हा मी जाहीर भूमिका घेतली. की, नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे. माझा सदस्य असला तरीही ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यात आहे. पण या ठिकाणी तुमचा डाव लक्षात येतोय. तुम्हाला एक सदस्य निलंबित करायचा आहे. ज्या प्रकारे 12 सदस्य तुम्ही एक वर्षाकरता निलंबित केले. अजून एक निलंबित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तुम्ही आमच्यावर कितीही कारवाई केली ना तरीही आम्ही या ठिकाणी लढू. पण ज्या प्रकारे हे सगळं ठरवून चाललं आहे. हे योग्य नाही.'

'जी घटना घडली ती योग्य नव्हतीच. तिचा निषेध करु आम्ही.. आणि आवश्यकता असेल तर त्या सदस्याला जाब आम्ही विचारु. पण बाहेरच्या घटनांवर अशा प्रकारे जर सुरु झालं.. आणि नाव न घेतलेल्या घटनांवर अशाप्रकारे सुरु झालं.. तर लक्षात ठेवा.. सरकार बदलत राहतं.'

coming government will not keep any opposition why did devendra fadnavis say that vidhansabha shiv sena vs bjp
विधानसभा: 'तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव', नितेश राणेंच्या वक्तव्यावर भास्कर जाधव प्रचंड संतापले!

'एकदा पायंडा पाडला तर यानंतर लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय येणारं सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि या लोकशाहीची हत्या होईल. त्या दिवशीही हा विषय समोर आला होता. रुलिंग झालं आहे आता सभागृहाचं कामकाज हे सुरु झालं पाहिजे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे नितेश राणे यांचा बचाव केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in