आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे, सेलिब्रिटींच्या नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकतो आहे. उलट सेलिब्रिटींना भाजपपासून संरक्षण दिलं जावं अशीही मागणी आम्ही केली आहे. देश पातळीवर भाजपकडून लोकशाहीचे मानक पायदळी तुडवले जात आहेत असंही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. आज सकाळीच सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी झूम कॉलद्वारे संपर्क साधला. त्यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी ट्विट कशी सारखी आहेत हे लक्षात आणून दिलं. ज्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात कुणाचा हात आहे का? हे गुप्तचर यंत्रणेमार्फत शोधलं जाईल असं स्पष्ट केलं.
यातून भाजपा कनेक्शन दिसते. अनेक जणांनी याअगोदर राजकीय ट्विट कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना दबाव आणून भाग पाडले जात आहे का? याची चौकशी आम्ही मागितली आहे. आमच्या विरोधात ही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आले पाहिजे. पण जर भाजपा ची भीती असेल तर ती दूर झाली पाहिजे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 8, 2021
अनिल देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश देताच भाजपने काँग्रेससह, महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सरकारचें डोकं ठिकाणावर आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आता सचिन सावंत यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
आता कुठे गेला तुमचा मराठीचा अभिमान? आता कुठे गेला तुमचा महाराष्ट्र धर्म? भारतरत्नांच्या ट्विटची चौकशी करणं हे प्रचंड निषेधार्ह आहे. आपल्या देशाला अशी रत्नं शोधूनही सापडणार नाही. तुम्ही अशा रत्नांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत जे आपल्या देशाचा आवाज आहेत. महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? महाविकास आघाडी सरकारला या कृतीबद्दल नक्कीच लाज वाटली पाहिजे. आता सरकारचं मानसिक संतुलन ढळलं तर नाही ना? याच गोष्टीची चौकशी करणं बाकी आहे या आशयाचं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या टीकेवर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे सचिन सावंत यांनी?
भारतीय जनता पक्ष आम्ही केलेल्या मागणीचा जाणीवपूर्वक विपर्यास करून बोंब ठोकतो आहे. आम्ही भाजपची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सेलिब्रिटींची नाही, उलट सेलिब्रिटींना भाजपपासून संरक्षण मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. भाजपचे कनेक्शन आहे हे दिसून येते आहे. अनेक जणांनी याआधी कधीच राजकीय ट्विट केलेलं नाही. त्यामुळे दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडले जाते आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमच्या विरोधातही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आलं पाहिजे. पण ही भीती भाजपची असेल तर ती दूर झाली पाहिजे. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.