Corbevax : कोरोनावरील कॉर्बेव्हॅक्स लसीला बूस्टर म्हणून मान्यता, DCGI चा निर्णय
कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बायलॉजिकल ईची कोरोना लस असलेल्या कॉर्बेव्हॅक्स या लसीला १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही मान्यता दिली आहे.
आता या मान्यतेनंतर कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतलेले १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक आता आपात्कालीन परिस्थितीत कॉर्बेव्हॅक्स लस बूस्टर म्हणून घेऊ शकणार आहेत.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस ५ ते १२ वयोगटातील मुलांना लस देण्याच्या आपात्कालीन वापरासाठी कॉर्बेव्हॅक्सला मंजुरी दिली होती. त्याआधी ही लस १२ ते १४ या वयोगटातील मुलांना दिली जात होती. बायोलॉजिकल ई ने मे मध्ये खासगी लसीकरण केंद्रांसाठी कॉर्बेव्हॅक्सची किंमत प्रति डोस ८४० रूपयांवरून २५० रूपयांपर्यंत कमी केली होती.
कॉर्बेव्हॅक्स ही भारतातली पहिली लस आहे जिला हेट्रोलोगस कोव्हिड बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. बायोलॉजिकल ई चा कॉर्बेव्हॅक्स बूस्टर डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्डच्या दोन डोसच्या सहा महिन्यांच्या आत दिला जाऊ शकतो.
गेल्या काही दिवासांपासून देशभरात कोरोना रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्ण वाढले आहेत. देशातही रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. देशातल्याही रूग्णांची संख्या वाढते आहे. अशात मास्क वापरण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईवर चौथ्या लाटेचं सावट आहे असंही बोललं जातं आहे. कोव्हिडच्या लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. आता बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे.