
राज्यात मागच्या आठवडाभरात कोरोना रूग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. मागच्या आठवड्याचा विचार केला तर १३०.८४ टक्के रूग्ण राज्यात वाढले आहेत. दिवसभरात राज्यात १०३६ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ३७४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १०३६ पैकी ६७६ रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७७ लाख ३८ हजार ९३८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.०३ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्याचा मृत्यू दर हा सध्या १.८७ टक्के इतका झाला आहे. राज्यातल्या पाच जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे.
मागच्या सात दिवसात राज्यातील कोव्हिड रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. यातल्या ९५ टक्के रूग्णांना लक्षणं नाहीत. साधारण ४ टक्के रूग्णांना लक्षणं आहेत आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर १.४ टक्के रूग्ण गंभीर आहेत.
कोणत्या जिल्ह्यात कशी वाढली रूग्णसंख्या?
मुंबई
२३ ते २९ मे -२०७० रूग्ण
३० ते ५ जून-४८८० रूग्ण
पुणे
२३ ते २९ मे-३५७ रूग्ण
३० मे ते ५ जून-५३८ रूग्ण
ठाणे
२३ ते २९ मे-४२७ रूग्ण
३० मे ते ५ जून-१२४५ रूग्ण
रायगड
२३ ते २९ मे-१०६ रूग्ण
३० मे ते ५ जून-२४४ रूग्ण
पालघर
२३ ते २९ मे-३२ नवे रूग्ण
३० मे ते ५ जून-१४४ रूग्ण
महाराष्ट्रात रूग्ण वाढू लागल्याने दोन दिवसांपूर्वीच सरकारने सगळ्यांना मास्क वापरम्याचं आवाहन केलं आहे. मास्क सक्ती नाही मात्र वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन लोकांनी मास्क लावावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
राज्यमंत्री मंडळ बैठकीत आम्ही कोव्हिडबाबत कायमच सविस्तर अशी माहिती सादर करत असतो. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढली आहे. या ठिकाणी चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही आज देण्यात आल्या आहेत. रविवार असल्याने चाचण्या कमी झाल्या मात्र आजपासून हे प्रमाण वाढवा असं सांगण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये आठ, सहा, पाच, तीन टक्के असा पॉझिटिव्हिटी रेट आहे. सध्या फार काळजीचं कारण नाही मात्र खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.