
मुंबई, ठाण्यासह राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढण्याची भीती गडद होऊ लागली आहे. मागील काही दिवसांत मुंबईत रुग्णसंख्येनं अचानक उसळी घेतली असून, राज्यात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात १,३५७ रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीतीही वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्र आणि मुंबईतल्या वाढत्या कोरोना रूग्णेसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
शनिवारी (४ जून) महाराष्ट्रात १,३५७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. तर ५९५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३७ हजार ९५० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९८.०५ टक्के इतका झाला आहे. तर आज दिवसभरात राज्यात १९ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर १.८७ टक्के इतका आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ कोटी १० लाख ३५ हजार २७६ नमुन्यांपैकी ७८ लाख ९१ हजार ७०३ नमुने आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ हजार ८८८ सक्रिय रूग्ण आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली, तरीही घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच मास्क वापरण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.
मुंबईत ८०० हून जास्त रूग्ण
शनिवारी मुंबईत ८८९ रूग्णांची नोंद झाली, तर ३२९ रूग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत मुंबईत १० लाख ४५ हजार ३५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे. सध्या मुंबईत ४ हजार २९४ सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट १३९६ दिवसांवर गेला आहे.
३१ मे पासून मुंबईत कसे वाढले रूग्ण?
३१ मे-५०६ रूग्णांची नोंद
१ जून ७३९ रूग्णांची नोंद
२ जून ७०४ रूग्णांची नोंद
३ जून ७६३ रूग्णांची नोंद
४ जून ८८९ रूग्णांची नोंद
मुंबईत रुग्ण वाढत असल्याने आणि तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथी लाट येण्याचा इशारा दिला असल्यानं बृहन्मुंबई महापालिकेनं खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये. महापालिकेनं चौथी लाट रोखण्यासाठी हर घर दस्तक मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जाणार आहे.
कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे.
मास्क वापरण्यावरून गोंधळ
राज्याचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पत्र पाठवलेलं आहे. त्यात बंदिस्त वातावरण असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्याबद्दलचा उल्लेख होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती अशी चर्चा सुरू झाली होती.
त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल गोंधळ दूर केला. पत्रात मस्ट हा शब्द असला, तो बंधनकारक या अर्थाने नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावं, असं ते म्हणाले.