
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 2,172 कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहेत. मागील दीड महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात 2 हजारांहून जास्त रूग्ण आढळले असून, यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दुसरीकडे राज्यात दिवसभरात 22 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यू दर हा गेल्या काही महिन्यांपासून 2.12 टक्के इतकाच आहे.
मंगळवारी 1,098 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 65 लाख 4 हजार 831 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.65 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 86 लाख 45 हजार 512 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 61 हजार 486 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 11 हजार 232 व्यक्ती होमक्वारंटाईन तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
महाराष्ट्रात दिवसभरात एकाही ओमिक्रॉन रूग्णाची नोंद झाली नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब ठरली आहे. राज्यात आत्तापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 167 रूग्ण आहेत.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण 167 वर
मुंबई - 84
पिंपरी चिंचवड - 19
पुणे ग्रामीण - 17
पुणे महापालिका - 7
ठाणे - 7
सातारा - 5
उस्मानाबाद - 5
पनवेल - 5
नागपूर - 3
कल्याण डोंबिवली - 2
औरंगाबाद - 2
नांदेड - 2
बुलढाणा - 1
लातूर - 1
अहमदनगर - 1
अकोला - 1
वसई - 1
नवी मुंबई - 1
पालघर - 1
मीरा भाईंदर - 1
भिवंडी - 1
एकूण - 167
या 167 पैकी चार रूग्ण गुजरात, तीन रूग्ण कर्नाटक, दोन रूग्ण केरळ आणि दिल्ली येथील आहेत. तर प्रत्येकी एक रूग्ण छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औऱंगाबाद येथील आहेत. दोन रूग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रूग्ण आढळले आहेत. यापैकी 91 नागरिकांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 786 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 141 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत घडीला 11 हजार 492 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 2172 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 61 हजार 486 इतकी झाली आहे.