
कोरोनाच्या तिन्ही लाटा महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. दुसऱ्या लाटेत राज्यात प्रचंड नुकसान झालं आता तिसरी लाटही येऊन ओसरली. सगळी परिस्थिती नियंत्रणात असताना मुंबई तसंच राज्यातील कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. वेळीच खबरदारी घ्या आणि मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
आज महाराष्ट्रात ५३६ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ही संख्या ३५२ अशी आहे, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवलं. २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्यापासून मास्कही ऐच्छिक केला. तसंच कोरोनासंबंधीचे नियमही पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत. अशात कोरोना रूग्णांची वाढती संख्या टेन्शन वाढवते का? हा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
राज्यात २२ मे ते २६ मे कसे वाढले रूग्ण?
२२ मे-३२६ नवे रूग्ण
२३ मे-२०८ नवे रूग्ण
२४ मे-३३८ नवे रूग्ण
२५ मे-३३४ नवे रूग्ण
२६ मे-५५१ नवे रूग्ण
२३ मे पासून मुंबईतही वाढू लागले कोरोना रूग्ण
२३ मे-१५० नवे कोरोना रूग्ण
२४ मे-२१८ नवे कोरोना रूग्ण
२५ मे-२९५ नवे कोरोना रूग्ण
२६ मे-३५० नवे कोरोना रूग्ण
महाराष्ट्राचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.५९ टक्के आहे. मुंबई, पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळते आहे. वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता योग्य ती खबरदारी घेण्याचं आणि मास्क लावण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
कोरोना पूर्णपणे गेलेला नाही कोरोनाचे नवे स्ट्रेन येतच राहणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही वाढती रुग्ण संख्या काही प्रमाणात चिंतेचं कारण जरी असलं तरी घाबरुन न जाता आपली योग्य ती खबरदारी घ्या, गर्दीत किंवा गरज असेल तिथे मास्क वापरा, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा हेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.