
देशात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, मागील २४ तासांत देशात २,४५१ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात १७९ रुग्ण आढळून आले आहेत.
देशात मागील २४ तासांच्या कालावधीत २,४५१ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत गेल्या २४ तासांत आढळून आलेली रुग्णसंख्या काही प्रमाणात जास्त असून, सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. गुरुवारी २,३८० रुग्ण आढळून आले होते.
सध्या देशात १४ हजार २४१ सक्रीय रुग्ण असून, देशातील कोरोना संक्रमणाचा वेग ०.५५ टक्के इतका आहे. तर गेल्या आठवडाभराचा दर ०.४७ टक्के आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत ४ लाख ४८ हजार ९३९ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चार दिवसांत भारतात एक हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्ली-एनसीआरमधील परिस्थितीवर नजर टाकल्यास असं दिसतंय की, येथे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दिल्लीत गुरुवारी रात्रीपर्यंत कोरोनाचे ९६५ नवीन रुग्ण आढळून आले. सध्या दिल्लीत २ हजार ९७० सक्रीय रुग्ण असून, पॉझिटिव्ही रेट ४.७१ टक्के इतका आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्तवाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्वासाठी मोफत बुस्टर डोस दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात १७९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. १०६ रुग्णांना रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट सध्या ९८.११ टक्के इतका असून, गुरुवारी दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. तर सक्रीय रुग्णसंख्या ७६२ इतकी आहे.
पुन्हा मास्क सक्तीच्या दिशेने
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं राज्यांकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क सक्तीच्या दिशेनं पावलं टाकली जात आहेत. दिल्लीत मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क न घालणाऱ्या दंड आकारला जाणार आहे.
गुजरातमध्ये १०० दिवसांनंतर पहिला मृत्यू
गुजरातमध्ये १०० दिवसानंतर कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. पाच वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जामनगरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीली हलकी लक्षणं होती. त्यानंतर तिला गुरु गोविंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच मुलीचा मृत्यू झाला.