
कोरोनाच्या तीन लाटांतून बाहेर पडलेल्या महाराष्ट्र आणि देशावर पुन्हा एकदा चौथ्या लाटेचं संकट घोंगावताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी बघितली, तर रुग्ण ६५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क सक्ती येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
कोरोनाचा एक्सई व्हेरियंट आढळून आल्यानंतर चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता रुग्णसंख्या वाढल्याने ही भीती गडद होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,०६७ रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी १,२४७ रुग्ण आढळून आले होते. याचाच अर्थ देशात २४ तासांच्या कालावधीतच ६५ टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे.
२४ तासांत देशात १,५४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशातील सक्रीय रुग्णसंख्येतही वाढ झाली असून, १२ हजार ३४० वर पोहोचली आहे. २४ तासांच्या कालावधीतच ४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात ५ लाख २२ हजार ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
देशातील महत्त्वाच्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दिल्लीत मंगळवारी ६३२ रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात मंगळवारी १३७ रुग्ण आढळून आले. ही मोठी वाढ आहे. कारण सोमवारी राज्यात फक्त ५९ रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवडाभरात राज्यात ६९३ कोरोना रुग्ण आढळून आले होते. राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट ०.४ टक्के इतका झाला आहे.
राजेश टोपे काय म्हणाले?
"महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्यातरी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे, मात्र सर्व स्थिती नियंत्रणात आहे. सध्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे. टास्क फोर्सकडून आम्ही माहिती घेत आहोत, परिस्थितीवर आमची नजर आहे," अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
"सरकारने मुलांना लस देण्यास सुरूवात केली आहे. १२ ते १५ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्याचं काम सुरूच आहे. खासगी रुग्णालयातही बुस्टर डोस दिला जात आहे. सध्या मास्कसक्ती करणं गरजेचं नाहीये, पण गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी जरूर मास्क घालावा," असं टोपे यांनी सांगितलं.