
देशात गेल्या २४ तासांत ३ हजार १५७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढलून आले. शनिवारच्या तुलनेत गेल्या २४ आढळून आलेले रुग्णसंख्या ५.० टक्क्यांनी कमी आहे. शनिवारी देशात ३ हजार ३२४ रुग्ण आढळून आले होते. सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या १९,५०० इतकी आहे.
भारतात पु्न्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, काही राज्यांत रुग्णवाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढत असलेल्या देशातील पहिल्या पाच राज्यांची परिस्थिती बघितली, तर राजधानी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळून आले आहेत. दिल्लीत १,४८५ रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीनंतर हरयाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशात २६८ आणि महाराष्ट्रात १६९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येपैकी ८६ टक्के रुग्ण या पाच राज्यात आढळून आले आहेत.
दिल्लीत ४७.०४ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांच्या कालावधीत देशात २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत देशात ५ लाख २३ हजार ८६९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याची सरासरी) ९८.७४ टक्के इतका असून, २४ तासांत २ हजार ७२३ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. लसीकरणाबद्दल सांगायचं तर २४ तासांत देशात ४ लाख २ हजार १७० जणांना डोस दिला गेला.
महाराष्ट्रातील स्थिती : महाराष्ट्रात रविवारी १६९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. महत्त्वाची बाब म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९५ इतकी आहे. शनिवारी राज्यात १५५ रुग्ण आढळून आले होते, तर एका मृत्यूची नोंद झाली होती. राज्याचा रिकव्हरी रेट ९८.११ टक्के असून, मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे.
दिल्लीतील स्थिती गंभीर
दिल्लीत रविवारी १ हजार ४८५ नवीन रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत एकही मृत्यू नोंदवला गेला नाही. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेट सध्या ४.८९ टक्के इतका असून, आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे दिल्लीत आतापर्यंत २६ हजार १७५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.