
मुंबईसह महाराष्ट्रातून कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. मुंबईत आणि राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, मुंबईत तिसऱ्या लाटेच्या पूर्वीप्रमाणेच रुग्ण आढळून येत आहे. दुसरीकडे राज्यातही पाच हजारांच्या आत रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे राज्यात आज 4 हजार 359 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. महत्त्वाचं म्हणजे 12 हजार 986 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. राज्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 52 हजार 238 इतकी आहे.
237 नवीन ओमिक्रॉन बाधित रुग्णांची भर
राज्यात आज दिवसभरात 237 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. 11 रुग्ण बीजे मेडिकल महाविद्यालयाकडून नोंदवण्यात आले आहेत. तर 226 रुग्ण मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयाकडून नोंदवण्यात आले आहेत. म्हणजेच पुण्यात 11, तर मुंबईत 226 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत 3,768 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी 3,334 रुग्ण ओमिक्रॉनमधून बरे झाले आहेत. त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 8,804 नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात आले. यापैकी 7,273 रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल मिळाले असून, 1,531 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर
मुंबईतील कोरोना परिस्थिती आता पुर्णपणे नियंत्रणात आल्याची परिस्थिती आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी मुंबईत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येप्रमाणेच मुंबईत आता रुग्ण आढळून येत आहे. मुंबईत 349 रुग्ण आढळले असून, 635 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत 2,925 सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1237 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 306 रुग्णांना लक्षणं नाहीत. मुंबईत आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.