Covaxin: मुलांना लस कधी मिळणार, किती डोस, कोणाला पहिली संधी?; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

Covaxin: मुलांना लस कधी मिळणार, किती डोस, कोणाला पहिली संधी?; मुलांच्या लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!
Covaxin: मुलांना लस कधी मिळणार, किती डोस, कोणाला पहिली संधी?; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!
coronavirus vaccine for kids covaxin answer every question in your mind about vaccinating children(फाइल फोटो)

मुंबई: कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने आता आणखी एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने मुलांसाठी लसीकरणाला मंजुरी दिली आहे. ज्यानंतर, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ही 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. जाणून घेऊयात त्याच सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे...

1. चाचणीमध्ये ही लस किती सुरक्षित ठरली आहे?

भारत बायोटेकने यावर्षी देशभरात 2 ते 18 वर्षे वयोगटातील अनेक मुलांवर Covaxin लसीची चाचणी घेतली. या मुलांना 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात आले. चाचणीमध्ये, ही लस मुलांवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्यांना कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. दरम्यान, मुलांच्या लसीकरणाला आता मंजुरी मिळालेली असली तरी नेमकं लसीकरण कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

2. मुलांसाठी लसीची गरज का लागली?

जगातील अनेक देशांमध्ये मुलांसाठी कोरोना लस आली आहे. तसंच मुलांचं लसीकरण देखील सुरू झालं आहे. तज्ज्ञ देखील मुलांचं लसीकरण व्हावं याच मताचे आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मुलांना देखील कोरोनाची लस मिळायला हवी कारण त्यांनाही याची लागण झाली आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लहान मुलांना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.

जरी कोरोनाचा भारतातील मुलांवर घातक परिणाम झालेला दिसून आला नाही, तरीही त्याबाबतची भीती अजूनही कायम आहे. ज्या मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही आणि त्यांना जर लस मिळाली तर कोरोना पासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

3. लहान मुलांसाठी लस आल्यानंतर तर ती प्रथम कोणाला मिळेल?

मुलांच्या लसीकरणाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता काही दिवसातच लसीकरणास देखील सुरुवात होईल. पण त्याआधी आता केंद्र सरकारकडून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचं काम सुरु झालं आहे.

यावेळी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही, त्यामुले ती ज्यांना कॅन्सर, दमा किंवा इतर कोणताही गंभीर आजार आहे त्यांना प्रथम दिली जाईल. यासंदर्भात मेदांता हॉस्पिटलचे चेअरमन डॉ नरेश त्रेहान सांगतात की, प्रौढांसाठी लसीकरण सुरू झाले तेव्हाही वृद्ध आणि ज्यांना कोणताही आजार आहे त्यांना प्राधान्य दिले जात होते. कारण अशा लोकांना हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका जास्त असतो. तोच निकष मुलांसाठी देखील लावला जाईल.

4. लस दिल्यानंतर शाळा पुन्हा सुरु होतील?

डॉ. त्रेहान म्हणतात की, शाळा आता देखील सुरू झालेल्या आहेत पण सावधगिरी बाळगून. खरं तर लहान मुलं कोव्हिडसंबंधी नियम पाळणं कठीण असतं. अशा परिस्थितीत, मुलांमध्ये संक्रमणाचा धोका अजूनही आहे. परंतु जसजसे लसीकरण सुरू राहील तसतसं लोकांमध्येही आत्मविश्वास वाढेल. त्यानंतर शाळा पुन्हा पूर्वीसारख्या सुरू होऊ शकतात.

5. लसीकरणामुळे फक्त मुलांना होणार फायदा?

नाही, प्रत्येकाला याचा फायदा होईल. डॉ. त्रेहान म्हणतात की, लसीकरणामुळे फक्त मुलांना फायदा होणार नाही तर इतरांनाही त्याचा फायदा होईल. कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की, कोरोनाची तिसरी लाट आली तर वृद्धांनाही मुलांद्वारे संसर्ग होऊ शकतो. परंतु जर मुलांना लस मिळाली तर त्यामुळे पर्यायाने त्यांच्या आजूबाजूचे लोकं देखील सुरक्षित राहिल. याचाच अर्थ सर्वांना फायदा होईल.

coronavirus vaccine for kids covaxin answer every question in your mind about vaccinating children
Covid-19 Vaccine: खुशखबर! लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनला मान्यता; मोफत मिळणार लस

6. मुलांसाठीही बूस्टर डोस असेल का?

आत्ता याबाबत काहीच सांगता येणार नाही, पण डॉ. त्रेहान सांगतात की, बूस्टर डोसबद्दल विचार सुरु आहे. ते म्हणतात की, ज्या लोकांमध्ये 6 महिन्यांनंतर अँटीबॉडीज कमी होत आहेत अशा लोकांन बूस्टर डोस देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. तसेच आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना किंवा वृद्धांना बूस्टर डोस देण्याबाबत विचार केला जात आहे. यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. तथापि, ते असेही म्हणाले की प्रथम आपल्याला संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल जे डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.