Covid 19 : महाराष्ट्रात 664 नव्या रूग्णांचं निदान, 16 मृत्यूंची नोंद

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात 664 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 16 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 915 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 85 हजार 335 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.71 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 6 कोटी 58 लाख 39 हजार 692 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 37 हजार 289 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 79 हजार 919 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 881 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्ण तपासणी
कोरोना रुग्ण तपासणी फोटो-इंडिया टुडे

राज्यात आज घडीला 7132 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 664 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 66 लाख 37 हजार 289 इतकी झाली आहे. आज राज्यातील कोव्हिड रूग्ण संख्येचे दिनांक 26 नोव्हेंबर 2021 पर्यंतची रेकाँसिलिएशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दुहेरी नोंदी वगळणे, जुने मृत्यू अद्ययावत करणे या ताळमेळ प्रक्रियेत आज राज्यातील एकूण रुग्ण संख्येत 596 ने तर बरे झालेले रुग्ण संख्येत 870 ने घट झाली आहे.तर राज्याची एकूण मृत्युसंख्या 84 ने वाढली आहे.

कोरोना रुग्णसंख्या
Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी

ओमिक्रॉन व्हेरियंट आणि करण्यात येणारी कार्यवाही -

दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोव्हिड 19 विषाणूच्या व्हेरियंटला ओमिक्रॉन असे नाव दिले आहे. हा व्हेरिअंट 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' असल्याचे नमूद केले आहे. विषाणू मधील या जनुकीय बदलामुळे त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलांमुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढल्याचे सध्या दिसत असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का किंवा हा नवा विषाणू प्रतिकार शक्ती भेदून संसर्ग करू शकेल का? याबाबत आताच निश्चित भाष्य करणे कठीण असले तरी येत्या दोन आठवड्यात या बदल अधिक माहिती मिळू शकेल.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.(प्रातिनिधिक फोटो)

या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन आढळून आला आहे असे इतर 11 देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आर टी पी सी आर टेस्ट करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी आर टी पी सी आर निगेटिव्ह आढळतील त्यांनाही 7 दिवसांच्या क्वारंटाईननंतर पुन्हा टेस्ट करण्यात येईल आणि ते कोविड बाधित आढळल्यास त्यांच्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे.

जे प्रवासी ओमिक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत त्यांच्यातील देखील 5 टक्के प्रवाशांची प्रयोगशाळा तपासणी करुन त्यातील पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे भारत सरकारने आदेशित केले आहे.

सध्या राज्यात अफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून आलेले सहा प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला असून या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोविड बाधित आले असून त्यांचेही नमुने एन आय व्ही पुणे येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. हे सर्व प्रवासी कोविड बाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.

विषाणू मध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार सातत्याने करावा, मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे तसेच ज्यांचे लसीकरण अद्याप अपुरे आहे अथवा ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी आपले लसीकरण त्वरेने पूर्ण करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in