Covid 19- महाराष्ट्रात 809 नवीन रूग्णांचं निदान, 10 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभागाने दिली माहिती
Covid 19- महाराष्ट्रात 809 नवीन रूग्णांचं निदान, 10 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या कमी (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 809 कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे तर 10 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 1101 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 64,52,486 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के इतके झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 27, 52, 687 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 11 हजार 887 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 60 हजार 432 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 15,552 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 267 नवे रूग्ण

मुंबईत दिवसभरात 267 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 420 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आज मुंबईत चार मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्या चार रूग्णांचा मृत्यू झाला त्यातले दोन पुरूष आणि दोन महिला होत्या. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

डोंबिवलीत कलम 144

दिवाळीच्या दिवशी फडके रोड आणि नेहरू रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करू नका तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच सीआरपीसी कलम 144 लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ऐन दिवाळीत डोंबिवलीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही तरूणांना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर न जमता दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

तीन देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट, राजेश टोपे काय म्हणाले?

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना जगभरातील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. रशिया ,इंग्लड आणि चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच ICMR ने याबाबत नियमावली ठरवावी असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचं पहायला मिळतं आहे. त्यामुळे चीनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार सर्वप्रथम चीनमध्ये झाला होता, त्यानंतर जगभराला त्याचा सामना करावा लागला होता. ब्रिटन आणि रशियामध्येही कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. आता तिसऱ्या लाटेनेही तोंड वर काढलं असून या देशांमध्येही काही भागांत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने या देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी, प्रवाशांसाठी विशेष सूचना जारी केल्या पाहिजेत. नियमावली कठोर केली पाहिजे असंही मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in