कोरोनाचा वाढता कहर आणि वाढते रूग्ण हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने एक हजारांपेक्षा जास्त इमारती सील केल्या आहेत. आत्तापर्यंत मुंबईतल्या १३०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. २७४९ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. विदर्भासोबतच मुंबईतही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे का हा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
आत्तापर्यंत १३०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. या १३०५ इमारतींमध्ये २७४९ रूग्ण पॉझिटिव्ह आढलले आहेत. कोरोना रूग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेने काही नवे निर्देश लागू केले आहेत. ज्यामध्ये एका इमारतीत जर पाचपेक्षा जास्त कोरोना रूग्ण असतील तर ती इमारत सील करण्यात येईल. आता मुंबईत १३०५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. वाढती रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ
मुंबई महापालिकेने सील केलेल्या इमारतींची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. कोरोना रूग्ण वाढत असल्याने जे नवे निर्देश मुंबई महापालिकेने लागू केले आहेत त्यानुसार या इमारती सील करण्यात आल्या आहेत. ज्या इमारती सील करण्यात आल्या आहेत त्या भागातल्या नागरिकांनी अधिकची खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी असंही आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. जे नागरिक कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
१९ फेब्रुवारीपर्यंत समोर आलेली माहिती
मुंबईत सील केलेल्या एकूण इमारतींची संख्या – १३०५
या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती – ७१ हजार ८३८
एकूण पॉझिटिव्ह केसेस- २७४९
मुंबई महापालिकेने आणखी काय म्हटलं आहे?
“कोरोनाचे रूग्ण वाढत असताना एक बाब अशीही निदर्शनास आली आहे की लोक कोरोना प्रतिबंधासाठी आखून दिलेल्या गाईडलाईन्स पाळत नाहीत. ज्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे असे काही लोकही बागांमध्ये, इमारतींमध्ये फिरत आहेत. होम क्वारंटाईन लोकांच्या हातावर शिक्के मारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्या घडीला इमारतीत पाच पेक्षा जास्त रूग्ण आढळत असतील तर ती इमारत सील करण्यात येते आहे.”
मागील दहा दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. मागील दहा दिवसात जी रुग्णसंख्या समोर आली आहे ती हजाराच्या आसपासही गेली आहे. हे प्रमाण कमी झालं होतं मात्र आता ते वाढलं आहे.