Covid-19: निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दीड महिन्यात सात पटीने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Covid-19: निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
covid 19 if you dont want restrictions follow discipline said cm uddhav thackeray(फोटो सौजन्य: CMO)

मुंबई: कोव्हिड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोव्हिड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे. असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (2 जून) सायंकाळी कोव्हिड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

'वर्षा' निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोव्हिड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे. असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोव्हिड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोव्हिड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोव्हिडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोव्हिड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

covid 19 if you dont want restrictions follow discipline said cm uddhav thackeray
कोव्हिड संसर्ग झाला आहे पण लक्षणं दिसत नाहीत? सरकारने दिल्या 'या' मार्गदर्शक सूचना

'फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा'

कोव्हिड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोव्हिड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी कोव्हिड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

  • ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोव्हिड चाचणी करुन घ्या

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

  • बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

  • ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

  • आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

  • ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in