Covid 19 : महाराष्ट्रात 997 नव्या रूग्णांची नोंद, 41 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात 997 नव्या रूग्णांची नोंद, 41 मृत्यूंची नोंद
(फोटो सौजन्य - PTI)

महाराष्ट्रात 997 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 41 मृत्यूंची नोंद आज दिवसभरात झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 945 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 64 लाख 65 हजार 893 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता 97.64 टक्के झाला आहे.

आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 6 कोटी 37 लाख 47 हजार 431 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 22 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 1 लाख 7 हजार 33 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 1028 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सध्या 12290 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

देशात कोरोना व्हायरसचे रूग्ण कमी होत आहेत. दुसरी लाट महाभयंकर होती पण ती ओसरू लागली आहे. अशात गेल्या चोवीस तासात जी आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे टेन्शन वाढू शकतं. चोवीस तासात 501 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवाळीनंतर गुजरातमधे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासन सतर्क झालं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासात कोरोनाचे 12 हजार रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संख्येमुळे देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 3 कोटी 44 लाख 14 हजार 186 इतकी झाली आहे. सक्रिय रूग्ण 1 लाख 37 हजार 416 आहेत. गेल्या 267 दिवसांमधली ही सर्वात कमी संख्या आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 62 हजार 690 इतकी झाली आहे. आज सलग 35 व्या दिवशी कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण रोजच्या रूग्णांपेक्षा 20 हजारांनी कमी झाले आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. या काळात रोज चार लाखांहून जास्त नवे रूग्ण समोर येत होते. तसंच लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी आणि इलाज मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना अहवालाप्रमाणे गेल्या सात दिवसातले नवे कोरोना रूग्ण

मुंबई- 3 ते 9 नोव्हेंबर - 1715

पुणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 1412

ठाणे- 3 ते 9 नोव्हेंबर- 914

अहमदनगर- 3 ते 9 नोव्हेंबर-645

नाशिक- 3 ते 9 नोव्हेंबर-419

पाच जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या- 3 ते 9 नोव्हेंबर- 5023

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in