Booster Dose : तुम्हालाही बुस्टर डोस घ्यायचाय?; अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

Covid-19 Precaution Dose For 18+ : कुणाला घेता येणार, किती असेल किंमत आणि नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Booster Dose : तुम्हालाही बुस्टर डोस घ्यायचाय?; अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आढळून आलेला असतानाच केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांसाठी प्रतिबंधात्मक डोस म्हणजेच बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली आहे. आजपासून (१० एप्रिल) बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

या आधी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांपुढील सर्वांसाठी बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता १८ वर्ष पुर्ण झालेल्या सर्वांना बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस खासगी रुग्णालयात जाऊन घेता येणार आहे. यासाठी ठराविक शुल्क भरावं लागणार आहे. तर जाणून घेऊया बुस्टर डोसबद्दल संपूर्ण माहिती...

बुस्टर डोस का दिला जातोय?

जागतिक आरोग्य संघटनेनं बुस्टर डोसबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्यानंतरही लसीमुळे शरीरात तयार झालेली इम्युनिटी कमी होत असल्याचंही समोर आलेलं आहे. कोरोना लसीची परिणामकारकता काय कायम ठेवण्याच्या उद्देशाने बुस्टर डोस दिला जात आहे.

बुस्टर डोस कोण घेऊ शकतात?

कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यासाठीही काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. बुस्टर डोस घेण्यासाठी वयाची १८ वर्ष पुर्ण झालेली असावीत. त्याचबरोबर दुसरा निकष म्हणजे लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा.

बुस्टर डोस कोणत्या लसीचा असणार?

पहिल्या आणि दुसऱ्या डोस वेळी जी लस तुम्हाला देण्यात आली. त्याच लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्ड लसीचा घेतला असेल, तर तुम्हाला बुस्टर डोसही कोविशिल्ड लसीचाच दिला जाईल.

बुस्टर डोसची किंमत किती आहे?

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना बुस्टर डोस घेण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड, तर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात २२५ रुपयांना बुस्टर डोस घेता येईल. यापूर्वी कोविशिल्डचा एक डोस ६०० रुपये, तर कोव्हॅक्सिनचा डोस १,२०० रुपयांना होता. २२५ रुपयांबरोबर रुग्णालयाकडून सेवाशुल्क आकारलं जाईल जे जास्तीत जास्त १५० रुपये असेल.

बुस्टर डोस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे बुस्टर डोस घेण्यासाठी नव्याने कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज नाही. बुस्टर डोस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर जाऊन आधीच्याच मोबाईल नंबरने (पहिल्या आणि दुसऱ्या डोस वेळी ज्या नंबरवरून नोंदणी केली, तो मोबाईल नंबर) लॉगिन करायचं आहे आणि पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी ज्या पद्धतीने स्लॉट बुक केला, त्याच पद्धतीने बुस्टर डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करायचा आहे. त्यानंतर लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ आदींची निश्चित करायची आहे.

Related Stories

No stories found.