15 ते 18 वयोगटातील मुलांचं आजपासून लसीकरण; लस घ्यायला जाताना 'ही' गोष्ट विसरू नका

Vaccination for 15 to18 age group : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणसाठी राज्यात 650, तर मुंबईत नऊ केंद्र
15 ते 18 वयोगटातील मुलांचं आजपासून लसीकरण; लस घ्यायला जाताना 'ही' गोष्ट विसरू नका
लसीकरण केंद्रावरील प्रातिनिधीक छायाचित्र.AajTak

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचं ढग गडद होत असतानाच आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी देशभरात तयारी करण्यात आली असून, महाराष्ट्रातही तब्बल 650 लसीकरण केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्येही व्यवस्था करण्यात आली असून, मुंबईतही 9 केंद्रांवर मुलाचं लसीकरण केलं जाणार आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा देशात वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. 1 जानेवारीपासून लस नोंदणी सुरू झालेली असून, लसीकरण आजपासून सुरू होत आहे. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील 650 केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण केलं जाणार आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (1 जानेवारी) सुरू करण्यात झालेली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

2007 मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले कोरोना लस घेण्यासाठी पात्र असल्याचंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. जालन्यातील जिल्हा महिला रुग्णालयात लसीकरण कार्यक्रम होणार आहे.

कोण घेऊ शकणार लस? कोणती कागदपत्रं लागणार?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे 2007 या वर्षी किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं लस घेण्यासाठी पात्र आहेत. लस घेण्यासाठी शाळेचं किंवा आधार ओळखपत्र असणं आवश्यक आहे. कोविन या अॅपवरून वा थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येणार आहे.

मुंबईत कुठे मिळणार लस?

मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई 9 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लस उपलब्ध असणार आहे. यात रिचर्डंसन अँड कुडास, भायखळा (ई वार्ड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, भायखळा (ई वार्ड), सोमय्या जंबो सेंटर, सायन (वार्ड एफ/उत्तर), एनएससीआय डोम जंबो फॅसिलिटी, वरळी (वार्ड जी/द.), बीकेसी जंबो कोविड सेंटर (वार्ड एच/पूर्व), मालाड जंबो कोविड सेंटर (वॉर्ड पी/उत्तर), नेस्को फेझ-1, गोरेगाव (पू. (वार्ड पी/दक्षिण), दहिसर जंबो कोविड सेंटर, दहिसर (वार्ड आर/उत्तर), कांजूरमार्ग सी अँड जी जंबो सेंटर (वार्ड एस), मुलुंड आर अँड सी जंबो कोविड सेंटर-1 (वार्ड टी) या ठिकाणी मुलांच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in